वृत्तसंस्था/जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेतील एका बारमध्ये सामूहिक गोळीबाराच्या घटनेत किमान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर मध्यरात्रीनंतर जोहान्सबर्गच्या सोवेटो येथील एका बारमध्ये शिरले आणि त्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. गोळीबारानंतर हे हल्लेखोर पांढऱया रंगाच्या मिनीबसमधून फरार झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेत 10 जण जखमी झाले असून यातील 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये किशोरवयीनांचा समावेश आहे. तर या गोळीबाराप्रकरणी अद्याप कुणालाच अटक झालेली नाही.
बारमध्ये लोक ड्रिंकचा आनंद घेत असताना हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना रात्री सुमारे 12.30 वाजता घडली आहे. गोळीबारात 12 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती गौतेंग पोलीस आयुक्त इलियास मावेला यांनी दिली आहे.
मृतांचे वय 19-35 वर्षांदरम्यान असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या गोळीबाराच्या घटनेनंतरचे चित्रण ऑनलाईन पोस्ट करण्यात आले असून यात जमिनीवर अनेक मृतदेह दिसून येत आहेत. यापूर्वी क्वाजुलु-नतालमध्ये एका बारमध्ये शुक्रवारी झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला होता.
मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील ईस्ट लंडन या शहरातील एका नाइट क्लबमध्ये झालेल्या एका संशयास्पद घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला होता. या सर्वांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या नाइट क्लबमध्ये शालेय परीक्षा संपल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी किशोरवयीन पोहोचले होते.