प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात अडकलेल्या सुमारे 1473 प्रवाशांना घेऊन काल श्रमिक ट्रेन हिमाचल प्रदेशकडे रवाना झाली. काल सकाळपासून हे प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. ही ट्रेन सायंकाळी 6 वाजता निघाली. तत्पूर्वी सर्व प्रवाशांची थर्मल गनने चाचणी करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरून 721 प्रवाशांना घेऊन श्रमिक टेन जम्मू काश्मिरकडे रवाना झाली होती. हे ट्रेन उधमपूरला दाखल झाल्यानंतर काल बुधवारी 1473 प्रवासी हिमाचल प्रदेशकडे रवाना झाले. हिमाचल प्रदेश मधील अनेक युवक गोव्यात वेगवेगळा व्यवसाय करायचे. लॉकडाऊनमुळे ते गोव्यात अडकून पडले होते. त्याच बरोबर काही जण पर्यटक म्हणून आले होते तसेच काही विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता.
काल सकाळपासून या प्रवाशांची सर्व माहिती गोळा करणे, त्याची थर्मल गनने तपासणी करणे इत्यादी कामे हाती घेण्यात आली होती. काल उशिरा सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही ट्रेन रवाना झाली. उपजिल्हाधिकाऱयांने ट्रेनला हिरवा बावटा दाखविला. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद गांवस देखील उपस्थित होते.