पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमध्ये पुन्हा एकदा संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढलो असून शनिवारी राज्याच्या कैमूर जिल्हय़ात दरोडेखोरांनी रखवालदाराची हत्या करुन बँकेतील 15 लाख रुपये लुटले आहेत. हा दरोडा दिवसाढवळय़ा पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना पोखरा येथे घडली. दरोडेखोरांनी बँकेच्या रखवालदाराची गोळय़ा घालून हत्या केली आणि ही लूट केली.
यावेळी बँकेतील इतर कर्मचारीही कामावर उपस्थित होते. परंतू ते काहीही करु शकले नाहीत. हत्या झालेल्या रखवालदाराचे नाव भानुकुमार चौबे असे आहे. त्याच्यासह फिरोज अन्सारी हा दुसरा रखवालदरही तेथे उपस्थित होता. दरोडा पडलेली शाखा पंजाब नॅशनल बँकेची आहे. दरोडेखोरांनी लुटलेले पैसे हे एटीएम मशिनमध्ये घालण्यासाठी मागविण्यात आले होते. पैसे घेऊन येणारी व्हॅन बँकेच्या आवारात आल्यानंतर दरोडेखोरांनी व्हॅनवर हल्ला केला आणि रखवालदाराची हत्या करुन सर्व पैसे लांबविले, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
लूट करण्यापूर्वी अज्ञान दरोडेखोरांनी सुसाट गोळीबार केला अशीही माहिती देण्यात आली आहे. याच गोळीबारात मुख्य रखवालदाराची हत्या झाली. दुसरा रखवालदार स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळून गेला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. दरोडेखोरांनी पैशासह पळून जाताना मृत रखवालदाराची बंदुकही पळवून नेली.
उच्च पातळीवर दखल
या घटनेची उच्च पातळीवर दखल घेण्यात आली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पथके राज्याच्या विविध भागांमध्ये पाठविली आाहेत. गुन्हेगार राज्याबाहेरील असण्याचीही शक्यता आहे. मात्र, या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर कठोर टीका केली आहे.