लॉकडाऊनमुळे 14 दिवस लस देणे अशक्य ः आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास 1 मे रोजी सांकेतिकपणे प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, लससाठा उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले नाही. 10 मेपासून लसीकरण सुरू होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, राज्यात सोमवारपासून लॉकडाऊन जारी झाल्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण 14 दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात पुरेशी लस उपलब्ध आहे. त्यामुळे युवकांना लस देण्यात अडचण नाही. मात्र, सोमवारपासून लॉकडाऊन जारी झाल्यामुळे युवा वर्गाला इस्पितळ किंवा लसीकरण केंद्रांमध्ये येणे शक्य नाही. वाहने घेऊन बाहेर पडण्यावर निर्बंध असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण शक्य नाही. त्यामुळे लसीकरण लांबवणीवर टाकण्याबाबत चर्चा केली आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
बेंगळूरमध्ये सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना नियंत्रणाची जबाबदारी केवळ सरकारचीच नाही तर जनतेचेही सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारवरही दबाव आणून राज्यात उत्पादन होणारे ऑक्सिजन येथेच वापरण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.