महापालिकेकडून गाळे ताब्यात घेण्यासाठी हालचाली : लीज संपलेल्या भाडेकरुंना नोटीस बजावण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या खुल्या जागा आणि व्यापारी संकुलातील गाळे विविध व्यवसाय थाटण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र मनपाच्या 16 व्यापारी संकुलातील 181 गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. गाळेधारकांच्या भाडेकराराची मुदत संपली असल्याने गाळे ताब्यात घेण्यासाठी आता महापालिकेने हालचाली चालविल्या
आहेत.
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आणि व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. तीन आणि पाच वर्षे कालावधीसाठी देण्यात आलेल्या जागांची मुदत संपुष्टात आली आहे. महापालिकेने विविध आकारातील जागा आणि व्यापारी गाळे विविध व्यवसाय थाटण्यासाठी दिले होते. अडीचशेहून अधिक जागा लीजवर देण्यात आल्या होत्या. मात्र यापैकी बहुतांश गाळय़ांची लीज संपुष्टात आल्याने महसूल विभागाच्यावतीने लीजधारकांना नोटीस बजावून जागेचा ताबा देण्याची सूचना देण्यात आली आहे. अलिकडेच महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी व्यापारी संकुलांची पाहणी करून लीज संपलेल्या गाळय़ांची माहिती घेतली आहे. तसेच गाळे रिकामी करण्याची सूचना लीजधारकांना केली
आहे.
भाडेकरू भाडे भरत नसल्याचे निदर्शनास
सध्या लीज संपुष्टात आलेल्या गाळय़ांतील भाडेकरू भाडे भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असल्याने याची दखल प्रशासकांनी घेतली असून लीज संपलेल्या भाडेकरुंना गाळे ताब्यात देण्यासाठी नोटीस बजावण्याची सूचना महापालिकेला केली आहे. महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी व्यापारी संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. पण लीजवर दिलेल्या गाळय़ांची मुदत संपल्याने भाडे जमा होत नसल्याने मनपाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आता लीज संपलेले गाळे रिकामी करून लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या महसूल विभागाने हालचाली चालविल्या आहेत.
व्यापारी संकुलातील गाळय़ांचा तपशील
व्यापारी संकुल | गाळय़ांची संख्या |
---|---|
मनपा इमारत | 8 |
नवीन मोडका बाजार | 40 |
माळमारुती कॉम्प्लेक्स | 10 |
महात्मा फुले भाजी मार्केट | 26 |
धारवाड रोड मिनी कॉम्प्लेक्स | 5 |
टिळकवाडी नवीन भाजी मार्केट | 8 |
कोलकार मार्केट | 10 |
चावी मार्केट | 20 |
कसाई गल्ली मटण मार्केट | 41 |
कसाई गल्ली बिफ मार्केट | 12 |
कोनवाळ गल्ली मटण मार्केट | 1 |