पुणे / वार्ताहर :
नामांकित चंदुकाका सराफ ऍन्ड सन्सच्या नावाने एका भामटय़ाने स्टेट बँकेच्या शाखेत फोन करुन बँकेला आरटीजीएसद्वारे 19 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास लावून गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष जवखेडकर (वय 46, रा. बाणेर, पुणे) यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बंडगार्डन परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स या नावाने कंपनीचे चालू खाते आहे. या चालू खात्यावर पैशांचे व्यवहार करण्याकरिता तीन जणांना सह्यांचे अधिकार देण्यात आले आहेत. 20 डिसेंबर रोजी एका अज्ञात क्रमांकावरुन बँकेचे शाखा व्यवस्थापक जवखेडकर यांना मोबाईलवर फोन आला. समोरील व्यक्तीने तो चंदुकाका सराफमधून संचालक किशोरकुमार शहा बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मुदत ठेवीकरिता दोन कोटी रुपये ठेवण्यासंर्दभात व्याजदराची चौकशी करत त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याबाबतही चौकशी केली. समोरील व्यक्तीने म्युच्युअल फंडात गुंतवणुक करावयाची असल्याचे सांगून सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांच्या ऑफीसमध्ये येण्यास सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन वेळा फोन करुन आपणच किशोरकुमार शहा बोलत असल्याचे बँक व्यवस्थापकास भासवले. त्यानंतर चंदुकाका सराफ यांचे जवळचे नातेवाईकाचे मेडिकल इर्मजन्सी आहे. त्यामुळे त्यांना साडेनऊ लाख रुपये आणि सात लाख 55 हजार रुपये दोन आरटीजीएस तत्काळ करावयाचे असल्याचे सांगुन मेलवर त्या बँक खात्याची माहिती चंदुकाका सराफ नावाचे मेल आयडीवरुन पाठविल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी बँकेस आलेला मेलची तपासणी केली असता त्यात चंदुकाका सराफ या कंपनीच्या खात्यावर रक्कम आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करण्यास सांगितले आणि संध्याकाळी सहा वाजता ऑफीसला येताना आरटीजीएस फॉर्म सही करण्यासाठी घेऊन येण्यासही सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी चौकशी केली तेव्हा एचडीएफसी बँकेचे दोन बँक खाते क्रमांक दिले होते. कंपनीचे चेक बुक संपल्यामुळे त्यांना आरटीजीएसद्वारे तात्काळ व्यवहार करावयाचे असल्याचे सांगण्यात आल्याने आणि किशोरकुमार शाह यांचा वारंवार फोन पैसे पाठवा म्हणून येत होता. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांनी सदर बँक खात्यावर साडेनऊ लाख आणि सात लाख 55 हजार रुपये पाठविण्यास सांगितल्याने व्यवस्थापकांनी दोन्ही खात्यावर साडेनऊ लाख असे एकूण 19 लाख रुपये पाठवून दिले. त्यामुळे सदर रक्कम ट्रान्सफर झाल्यावर हा प्रकार बँक मॅनेजरच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत शाह यांना विचारणा केली असता, त्यांनी सदर जादा रकमेचे व्हाऊचर तयार ठेवा मी बँकेत येऊन सही करतो असे सांगितले.
काही वेळानंतर चंदुकाका सराफ कंपनीतून तेथील कर्मचाऱ्याने बँकेत फोन करुन चौकशी केली त्यावेळी बँकेच्या व्यवस्थापकाने शहा यांचा फोन व ईमेल माहिती आधारे 19 लाख रुपये दोन खात्यावर पाठविल्याचे सांगितले. परंतु चंदुकाका सराफ कंपनीने यासंर्दभात बँकेला आम्ही कोणता ईमेल केला नसल्याचे बँकेस सांगितले. त्यामुळे सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे आरटीजीएस विभाग व एचडीएफसी आरटीजीएस विभागास ईमेल करुन सदर व्यवहार थांबविण्यास सांगितले. परंतु भामटय़ांनी त्यापूर्वीच एचडीएफसी बँकेतील पैसे आयसीआयसीआय बँकेत हस्तांतरित करुन घेतले. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरि÷ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर करत आहे.