पुणे / प्रतिनिधी :
नाशिक ते पुणेदरम्यान शिवशाही बसवर चालक म्हणून काम करणाऱ्या एकाने मुलासह आंतरराज्य दराेडा टाकणारी टाेळी बनवत ठिकठिकाणी दराेडे, जबरी चाेरी, घरफाेडी असे तब्बल २० गुन्हे केल्याची बाब पुणे ग्रामीण पाेलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पाेलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाेलिसांनी सहा आराेपींना अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी शनिवारी दिली.
नईम चांद शेख (वय-५२,रा.संजेरी, बाेऱ्हाडेमळा, नाशिक राेड, नाशिक) या बसचालकासह त्याचा मुलगा इशार्द नईम शेख (२८), माेहम्मद हनीफ अल्ला बंदखान (६२,रा. खाजराणा, इंदाेर), शुभम रामेश्वर मालवीय (२४,रा. पिपालिया, देवास), रहमान फजल शेख (३४,रा. राजेश्वरी मंगल कार्यालय, नाशिक) व लखन बाबुलाल कुंडलिया (३०, रा. देवास) या आराेपींना नाशिक, इंदाैर व देवास येथून पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा पाेलीस ठाण्याचे हद्दीत बेल्हे गाव येथे माजी सभापती सदाशिव बाेरचटे यांच्या राहत्या घरात सहा अनाेळखी दराेडेखाेरांनी त्यांच्या घराच्या कम्पाऊंडची जाळी कट करुन घराच्या हाॅलच्या भितींची जाळी कट करुन घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाेकांना काेयता व पिस्टलचा धाक दाखवून घरातील व अंगावरील ४९ ताेळे वजनाचे साेन्याचे दागिने व चार लाख रुपये राेख असा एकूण २८ लाख ५० हजार रुपयांचा माल दराेडा टाकून चाेरुन नेला हाेता. याबाबत आळेफाटा पाेलीस ठाण्यात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गंभीर प्रकरणाचा एलसीबीचे पथकही तपास करत हाेते. पाेलिसांनी घटनास्थळी पुढे आलेल्या माहितीचे आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढत एकाचवेळी नाशिक व मध्यप्रदेश येथे छापेमारी करत आराेपींना अटक केले. त्यांच्या ताब्यातून गुन्हयातील दाेन कारही जप्त करण्यात आल्या आहेत. सदर टाेळीने नाशिक परिसरात दिंडाेरी येथील एका कंपनीत दाेन गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. सदर आराेपींनी गुन्हयातील दराेडा टाकून चाेरलेल्या साेन्याची विल्हेवाट लावली हाेती परंतु पाेलीसांनी ते शाेधून काढले असून त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.