चोख पोलीस बंदोबस्त : शहराला छावणीचे स्वरूप : पोलीस आयुक्तांचा पुन्हा पाहणीदौरा
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवार दि. 3 मे रोजी होणारी बसव जयंती, रमजान ईद व बुधवारी 4 मे रोजी होणाऱया शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 200 अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेऱयांची शहरातील घडामोडींवर नजर असणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सोमवारी पुन्हा अधिकाऱयांसमवेत मिरवणूक मार्गाची पाहणी करून चर्चा केली.
पोलीस आयुक्त, उपायुक्त रविंद्र गडादी, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, मनपाचे कार्यकारी अभियंते सचिन कांबळे, चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, वन खात्याचे अधिकारी शिवानंद मगदूम, हेस्कॉमसह इतर शासकीय अधिकाऱयांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करून चर्चा केली.
पोलीस आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्येक भागाला भेटी देऊन बंदोबस्तासाठी पोलीस तैनात केले आहेत.
सोमवारी रात्री ‘तरुण भारत’ने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असता सलग तीन दिवस व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त, 3 उपायुक्त, 16 डीएसपी, 44 सीपीआय, 62 पीएसआय, 140 एएसआय, 2 हजार पोलीस व हवालदार, 600 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 12 तुकडय़ा, सशस्त्र दलाच्या 10 तुकडय़ा, विशेष विभागाच्या 3 तुकडय़ांबरोबरच गुप्तचर विभाग, अंतर्गत सुरक्षा विभागाच्या अधिकाऱयांनाही बंदोबस्तासाठी जुंपण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या उपलब्ध असलेल्या कॅमेऱयांबरोबरच मिरवणूक मार्गासह संवेदनशील भागात 200 अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 5 ड्रोनच्या माध्यमातून मिरवणुकीवर व संवेदनशील घडामोडींवर नजर ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला धक्का पोहोचू नये, यासाठी पोलीस दलाने तयारी केली आहे. दि. 3 व 4 मे रोजी वाहतूक मार्गही वेगवेगळय़ा ठिकाणी वळविण्यात आले आहेत.
समाजकंटकांना आयुक्तांचा इशारा
रमजान ईद, शिव-बसव जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन वर्षांनंतर शिवजयंतीची मिरवणूक होत आहे. उत्साहात व जल्लोषी वातावरणात सण साजरा करताना पोलीस दलाचे संपूर्ण सहकार्य असणार आहे. मात्र बेळगावच्या शांततेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱयांना कायद्याचा हिसका दाखविण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे.
देखावा सादर करण्यासाठी स्थळनिश्चिती…
शिवजयंती उत्सव मिरवणुकीत अनेक मंडळांकडून भव्य जिवंत देखावे साकारले जातात. मिरवणुकीत सलगता यावी यासाठी पोलीस दलाने देखावे सादर करण्यासाठी स्थळनिश्चिती केली आहे. मारुती गल्ली येथील आराधना साडी, मारुती मंदिर, समादेवी मंदिराजवळील कल्याण ज्वेलर्स, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक, हेमूकलानी चौक परिसरात मंडळांनी देखावे सादर करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे.