वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या कोविडमुळे मोठय़ा प्रमाणात उद्योगधंदे प्रभावीत झाले आहेत. यामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्येच लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. या काळजीच्या वातावरणात येत्या काळात काही प्रमाणात आशेचा किरण प्राप्त होणार असल्याचे संकेत निर्माण होत असून जागतिक स्तरावर आगामी 2022 पर्यंत 13.3 कोटी रोजगार उपलब्ध होणार असल्याचे संकेत आहेत.
सदरच्या रोजगारांमध्ये मनुष्यबळ विकास, मशीन आणि अन्य क्षेत्रात रोजगार प्राप्ती होणार आहे. बिगर सरकारी संघटनेने ही माहिती दिली आहे. भारतात युवकांसाठी डिजिटल आणि इंग्रजी साक्षरतेला चालना देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. अकादमीच्या पातळीवर आणि इंडस्ट्रीजला आवश्यक असणाऱया गरजेवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
अत्याधुनिक बदलाचा स्विकार
युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं गरजेचं असून याच्या आधारे त्यांना रोजगार नजिकच्या काळात प्राप्त करता येणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिनची माहिती, हरित ऊर्जासह अन्य क्षेत्राच्या गरजेनुसार आवश्यक ते कौशल्य प्राप्त करण्यावर युवकांना भर द्यावा लागणार असल्याचे म्हटले आहे.
युवा कौशल्य दिनाचे औचित्य
बिगर सरकारी संघटना वाधवानी फाउंडेशनकडून जागतिक युवा कौशल्य दिवसाच्या पूर्वसंध्येला हा अंदाज व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार वर्ष 2016 मध्ये 25.9 कोटी युवक असे होते की, ज्यांना रोजगार, शिक्षण आणि प्रशिक्षण नव्हते. ही संख्या 2019 पर्यंत वधारुन 26.7 कोटी झाली. जी 2021 पर्यंत वधारुन 27.3 कोटी होण्याचा अंदाज आहे.