यजमानांसाठी अनुकूल खेळ निवडण्याची अलिखित परंपरा कायम
मेलबर्न / वृत्तसंस्था
2026 मध्ये ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेमधून तिरंदाजीसह कुस्तीला वगळले गेले असून भारतासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. नेमबाजीला पुन्हा स्थान दिले गेले असले तरी त्यातही पिस्तोल, रायफल व शॉटगन हे भारतासाठी अनुकूल इव्हेंट्स समाविष्ट नाहीत. 2026 राष्ट्रकुल स्पर्धेत 20 क्रीडा प्रकारातून 26 इव्हेंट्स खेळवले जातील. यात 9 पॅरा स्पोर्ट्स असणार आहेत.
गतवर्षी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वादग्रस्तरित्या वगळले गेले होते. पुढील राष्ट्रकुलसाठी नेमबाजीचा नव्याने स्थान देण्यात आले. कुस्तीला वगळणे मात्र भारतासाठी सर्वार्थाने धक्कादायक ठरले. ऑस्ट्रेलियात कुस्ती फारशी लोकप्रिय नाही आणि यजमान देश आपल्याला अनुकूल खेळ निवडण्यावर भर देतात, या अलिखित परंपरेची येथे पुनरावृत्ती झाली आहे.
ऑस्ट्रेलियात नेमबाजी हा लोकप्रिय क्रीडा प्रकार असून ऑस्ट्रेलियाने 2018 गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये या खेळातून 3 सुवर्ण, 5 रौप्य व 1 कांस्य अशी 9 पदके जिंकली होती. आगामी स्पर्धेत नेमबाजीचा समावेश केला असला तरी फुल बोअर शुटिंग इव्हेंट्स त्यात असतील. फक्त पिस्तोल, रायफल व शॉटगन इव्हेंट्स घेतले जाणार नाहीत. भारतीय संघ फुल बोअर इव्हेंट्समध्ये इतका मजबूत नसल्याने याचा संघाला फटका बसू शकतो.
यापूर्वी, एप्रिलमध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रकुल स्पर्धा कार्यकारिणीकडे 2026 राष्ट्रकुल स्पर्धेसाठी नेमबाजी, कुस्ती व तिरंदाजीचा समावेश करण्याची लेखी विनंती केली होती. मात्र, याचा विचार केला गेलेला नाही. गोल्फ, बास्केटबॉल, व्हीलचेअर बास्केटबॉल, कोस्टल रोईंग, शुटिंग, पॅरा शुटिंग, बीएमक्स रेसिंग, माऊंटेन बाईक क्रॉस कंट्री, ट्रक सायकलिंग व पॅरा सायकलिंग ट्रकचा यंदा राष्ट्रकुल रोस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा 2026 मध्ये दि. 17 ते 29 मार्च या कालावधीत होणार आहे.