लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील झाशी शहरातील सैनिक छावणीत एका टी-90 रणगाडय़ाचे बॅरल फुटून झालेल्या अपघातात 2 सैनिक हुतात्मा झाल्याचे वृत्त आहे. हे सैनिक रणगाडय़ाची देखभाल करीत असताना शुक्रवारी हा अपघात झाला. रणगाडय़ाचा चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघात घडला तेव्हा रणगाडा तुकडीचा वार्षिक सराव सुरु होता, अशी माहिती देण्यात आली. शुक्रवारी सकाळी साधारणः 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ती तांत्रिक दोषामुळे घडल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, चौकशी झाल्यानंतरच नेमके कारण समोर येईल, असे सेनेच्या प्रवक्त्याने प्रतिपादन केले.
नायब सुभेदार सुमेर सिंग बगारिया (राजस्थान) आणि सुकांत मंडल (पश्चिम बंगाल) अशी हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावे आहेत. रणगाडय़ाचे बॅरल अतिउष्णतेमुळे फुटले असावे असे प्राथमिक तपासात आढळले आहे. रणगाडय़ाचा चालक प्रदीप हा जखमी झाला असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.