लसीकरणासाठी वडिलांना पाठीवर घेत 12 किमीची पायपीट
ब्राझीलच्या अमेझॉनमध्ये आदिवासी समुदायाच्या एका व्यक्तीचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतेय. हे छायाचित्र अत्यंत साधारण असले तरीही यामागील कहाणी भावुक करणारी आहे. या छायाचित्रात एका व्यक्ती कोरोनावरील लसीकरणाकरता स्वतःच्या वडिलांना पाठीवरून नेताना दिसून येतो. 24 वर्षीय तावी स्वतःच्या 67 वर्षीय वडिलांना पाठीवर बसून लसीकरण केंद्रावर पोहोचला आणि दोघांनीही लस टोचून घेतली.
लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तावी 6 तासांपर्यंत चालला आणि परतण्यासाठी पुन्हा 6 तासांची पायपीट त्याने केली आहे. वृद्ध वाहू यांना अत्यंत कमी दिसते, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना चालणेही फारसे जमत नसल्याचे हे छायाचित्र स्वतःच्या कॅमेऱयात कैद करणारे डॉ. एरिक जेनिंग्स सिमोस म्हणाले. हे छायाचित्र त्यांच्यामधील प्रेमाचे नाते दर्शविणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
जगातील सर्वात दुर्गम भागांपैकी एक असलेल्या अमेझॉनमध्ये लसीकरण मोहीम किती अवघड आहे याचा पुरावा म्हणजे हे छायाचित्र आहे. तावी आणि वाहू हे जो‘ए समुदायाचे सदस्य आहेत. हा समुदाय उत्तर पारा प्रांतातील कित्येक गावांमध्ये जगापासून वेगळा राहत असतो.
जंगलात लसीकरण
ब्राझीलमध्ये लसीकरणासाठी अधिकार या समुदायाच्या गावांमध्ये पोहोचण्यास कित्येक आठवडे लागले आहेत. जो‘ए समुदायाची संस्कृती आणि ज्ञान विचारात घेत लसीकरणासाठी जंगलात झोपडय़ांची निर्मिती करण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये कोरोनामुळे या समुदायाच्या 853 जणांना जीव गमवावा लागला आहे.