1 लाख 45 हजार रुपये असणार किंमत
वृत्तसंस्था/ मुंबई
सिम्पल एनर्जी कंपनीने आपली नवी दमदार मायलेजवाली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारामध्ये लाँच केली आहे. मुख्य म्हणजे ‘सिम्पल वन’ नावाने सादर केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचे मायलेज 212 कि.मी. इतके असणार असल्याची माहिती आहे.
प्रि-बुकिंगच्या माध्यमातून 18 महिन्यांच्या कालावधीत 1 लाख जणांनी सदरची गाडी बूक केली आहे. सदरची नवी स्कूटर ओला एस वनशी स्पर्धा करणार आहे. या दुचाकीची किंमत 1 लाख 45 हजार असणार असून यातील सुपर इव्ही प्रकारातील स्कूटरची किंमत 1 लाख 58 हजार असणार असल्याचे सांगितले जाते. संपूर्णपणे भारतामध्येच सदरची गाडी तयार करण्यात आली आहे. कंपनीने स्कूटरच्या वितरण कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे म्हटले आहे. याची सुरुवात बेंगळूरमधून होणार असून पुढील 12 महिन्यामध्ये 40 ते 50 शहरांमध्ये सदरची स्कूटर खरेदीकरिता उपलब्ध होणार आहे. सर्वाधिक मायलेज देणारी ही स्कूटर 0 ते 40 कि. मी. अंतर 2.77 सेकंदामध्ये कापू शकणार आहे. थर्मल व्यवस्थापन सिस्टीमवर आधारित ही स्कूटर आयआयटी इंदोर यांच्या सहकार्यातून कंपनीने विकसित केली आहे.