एप्रिलमधील आकडेवारीचा समावेश : जवळपास 1.96 अब्ज व्यवहारांची नोंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिल महिन्यात आधारकार्डचा वापर करुन पैशांचे व्यवहार विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. एप्रिलमध्ये आधारच्या मदतीने जवळपास 1.96 अब्ज व्यवहार झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या या महिन्यापेक्षा 19 टक्के अधिक आहेत. त्याच वेळी, एप्रिलमध्ये 250 दशलक्षहून अधिक ई-केवायसी व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.
एप्रिल 2023 मध्ये आधार धारकांनी 1.96 अब्ज व्यवहार केले आहेत जे एप्रिल 2022 च्या तुलनेत 19.3 टक्क्यांनी अधिक राहिले असल्याची नोंद आहे. सरकारी आकडेवारीनुसार यापैकी बहुतांश व्यवहार हे फिंगरप्रिंट वापरून केले गेले आहेत. त्यानंतर डेमोग्राफिक आणि ओटीपी वापरुनही काही व्यवहार करण्यात आले आहेत. याखेरीज फेशियल ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून व्यवहार यशस्वी झाले असल्याचे समोर आले आहे.
प्रौढांमध्ये आधार जवळजवळ प्रत्येकजण वापरतो, तर इतर वयोगटांमध्ये ही पातळी आता 94.8 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, यावरुन आधारच्या वाढत्या वापराची कल्पना यावी. एप्रिल महिन्यात, लोकांच्या विनंतीनुसार 15.44 दशलक्षाहून अधिक आधार अपडेट केले गेले. आधार सक्षम पेमेंट सिस्टिमच्या माध्यमातून लोक आर्थिक व्यवहार करत आहेत. एप्रिल 2023 मध्ये, एइपीएस आणि मायक्रो एटीएमच्या नेटवर्कद्वारे 200.6 दशलक्षाहून अधिक बँकिंग व्यवहार (आधारसह ऑनलाइन पैशाचे व्यवहार) शक्य झाले.आधार ई-केवायसी सेवा बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवा क्षेत्रात पारदर्शक आणि उत्तम ग्राहक अनुभव देऊन तसेच व्यवसाय करून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एकट्या एप्रिलमध्ये 250.5 दशलक्ष पेक्षा जास्त ईकेवायसी व्यवहार (आधार आधारित ई-केवायसी व्यवहार) झाले. आधार ई-केवायसी व्यवहारांची एकूण संख्या एप्रिल 2023 अखेर 14.95 अब्जांवर पोहोचली आहे.