काँग्रेसचे खा . कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून मंजूर
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या खासदार स्थानिक श्रेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून सिंधुदुर्ग जिल्हारुग्णालयाच्या दंतविभागाच्या बळकटीकरणासाठी 22 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व जिल्हा कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दंतविभाग कार्यरत आहे परंतू या विभागात दात काढण्यापलिकडे कोणतेही उपचार होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांना आपल्या दातावरील उपचार करण्यासाठी महागड्या खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात किंवा उपचार न करताच दातांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट,जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू,कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा व महिला बालकल्याण समीती सभापती आफ्रिन करोल इत्यादी काँग्रेस पदाधिकारी यांनी जिल्हारुग्णालयालयात जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रीपाद पाटील यांची भेट घेऊन दंतविभागात होणाऱ्या उपचारांची माहिती घेतल्यावर जिल्हा रुग्णालयाच्या दंतविभागात दात काढण्याशिवाय कोणतेही उपचार होत नाहीत अशी धक्कादायक महिती मिळाली. या संदर्भात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांना जिल्हा रुगणालयाच्या दंतविभागाच्या बळकटीकरणासाठी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. या विनंतीनुसार खासदार कुमार केतकर यांनी त्यांच्या खासदार स्थानिक श्रेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 22 लाख रुपयाचा निधी मंजूर केला.