प्रतिनिधी/ पणजी
फोंडा येथील एका इसमाला सुमारे 23 लाख 21 हजार 68 रुपयांना गंडा घालणाऱया संशयिताला सायबर क्राईम विभागाच्या पोलिसांनी दावणगिरी कर्नाटक येथे अटक केली आहे. संशयिताला ट्रान्जीट रिमांडवर गोव्यात आणले असून आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल. फसवणूक प्रकरणाबाबत फोंडा येथील विष्णू गावडे यांनी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव स्वप्निल नाईक असे आहे. संशयित हा पटाईत गुन्हेगार आहे. या अगोदर त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. कुडचडे पोलिसांनी त्याला दोनवेळा फसवणूक प्रकरणात अटक केली होती.
विष्णू गावडे यांच्या तक्ररीनुसार संशयित स्वप्निल नाईक याने तक्रारदार गावडे यांच्याशी बनावट फेसबुक खात्याद्वारे संपर्क केला होता. आपण मुलगी असल्याचे संशयिताने तक्रारदाराला भासविले होते. खोटी आमिषे दाखवून संशयिताने तक्रारदाराचे 23 लाख 21 हजार 68 रुपये हडप केले होते. हा प्रकार 27 जून ते 16 सप्टेंबर या कालावधीत झाला होता. कालांतराने आपण फसलो असल्याचे तक्रारदाराला कळताच त्याने सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली होती. याबाबत तपास काम करीत असताना पोलिसांनी संशयिताची बँक खाती, फोन तसेच व फेसबुक खात्याच्या माध्यमातून संशयिताचा शोध घेणे सुरू केले होते. संशयित कनार्टकातील विविधी जिह्यात फिरत असल्याचे पोलिसांना कळले होते अखेर दावणगिरी कनार्टक येथे संशयिताला अटक केली आहे.
अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विश्वेश कर्पे, सतीश पडवळकर, उपनिरीक्षक देवेंद्र पिंगळे, हवालदार योगेश खांडेपारकर, कॉन्स्टेबल संयोग शेटय़े व बसूराज हडपट यांनी ही कारवाई केली आहे. सायबर क्राईम विभाग पुढील तपास करीत आहेत.