मलकापुरात तांत्रिक बिघाड झाल्याने अडथळा, दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर
प्रतिनिधी / कराड
मलकापूर नगरपरिषदेच्या 24*7 नळपाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा गुरूवारी सकाळी अचानक खंडीत झाला. साडेअकरा लाख लिटरच्या टाकीचा व्हॉल्व अचानक नादुरूस्त झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला. या पार्श्वभुमीवर दुरूस्तीचे काम दिवसभर युद्धपातळीवर सुरू होते.
मलकापूर नगरपरिषदेच्या 24*7 नळपाणीपुरवठा योजनेच्या सेटलिंग टॅंकची दुरूस्ती गेल्या दहा दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. चारच दिवसांपुर्वी दुरूस्तीचे काम पुर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत झाला तोपर्यंत गुरूवारी सकाळी वनविभागाच्या कार्यालगत असलेल्या साडेअकरा लाख लिटर टाकीचा व्हॉल्व नादुरूस्त झाला. व्हॉल्वचा रॉड तुटल्याने हा अडथळा निर्माण झाला. त्याम़ुळे अचानक पाणीपुरवठा खंडीत झाला. नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जलअभियंता ए.पी. मोहिते यांच्या टिमने व्हॉल्व दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले. दिवसभर दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी साडेअकरा लाख लिटरची टाकी पुर्णता रिकामी करावी लागली. त्यानंतर व्हल्व दुरूस्तीच्या कामाने वेग घेतला.
नगराध्यक्षांकडून आढावा
पाणीपुरवठा खंडीत झाल्यावर मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांनी तातडीने शहरातील नागरिकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती देत पाणी दिवसभर जपून वापरण्याचे आवाहन केले. नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी दुरूस्तीच्या कामाचा आढावा घेतला. अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरूस्ती केल्याने रात्री दहापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे नगराध्यक्षा येडगे यांनी सांगितले.