जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 85 वर : नव्याने 14 रुग्ण : सुकळवाडला पाच पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. मंगळवारी आणखी 14 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या 85 वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्ण हे मालवण तालुक्यातील सर्वाधिक सहा, कणकवली, देवगड व कुडाळ तालुक्यातील प्रत्येकी दोन, तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. एकूण रुग्णांपैकी आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला असल्यामुळे जिल्हय़ात सद्यस्थितीत 75 रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचाराखाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकरी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या अहवालामध्ये कणकवली तालुक्यातील एका रुग्णाचा डबल रिपोर्ट आला होता. त्यामुळे दोनच रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आणि जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 71 वर पोहोचली होती. त्यानंतर मंगळवारी 136 कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 122 अहवाल निगेटिव्ह आले, तर 14 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 85 वर गेली आहे.
रुग्णसंख्या शतकासमिप
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये मार्च अखेरीस कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर एप्रिल अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हय़ात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात होती. परंतु जसजसे जिल्हय़ाबाहेरून लोक येऊ लागले, त्याप्रमाणे जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळुहळू वाढू लागली. मे महिन्याच्या मध्यानंतर तर पुणे, मुंबई या ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने लोक दाखल झाल्याने जिल्हय़ात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 85 वर पोहोचली असून शतकासमिप गेली आहे.
नव्याने आढळले 14 रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्हय़ात मंगळवारी आणखी नव्याने 14 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये मालवण तालुक्यात सर्वाधिक सहा रुग्ण असून सुकळवाडमध्ये एकाच गावात पाच, तर चिंदर येथे एक रुग्ण आढळला आहे. तसेच कणकवली तालुक्यात दोन रुग्ण आढळले असून तळेरे येथील एक व हरकूळ येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कुडाळ तालुक्यातही दोन रुग्ण आढळले असून त्यात पडवे येथील आणि डिगस येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच देवगड तालुक्यात वाडा व शिरगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण, सावंतवाडी तालुक्यात सातोसे येथील एक आणि वेंगुर्ले तालुक्यात मातोंड येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
25 गावांतील 37 वाडय़ांमध्ये कंटेनमेंट झोन
जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्मयातील शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण, वैभववाडी तालुक्मयातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे, सावंतवाडी तालुक्मयातील कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असनिये येथील भटवाडी, धनगरवाडी, वायंगणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, कुडाळ तालुक्मयातील पणदूर-मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी, मालवण तालुक्मयातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे कंटेनमेंट झोन आहेत.
23665 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात
जिल्हय़ात एकूण 23 हजार 665 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 488 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. 21 हजार 898 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 279 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्हय़ात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
अजून 134 नमुन्यांची प्रतीक्षा
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 2 हजार 32 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 898 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 86 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 812 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये एकाच रुग्णाच्या दोन अहवालांचा समावेश आहे. अजून 134 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 125 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 59 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये, तर कोविड केअर सेंटरमध्ये 21 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत मंगळवारी सहा हजार 113 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात 2 मे 2020 पासून मंगळवार अखेर एकूण 66 हजार 572 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
कोविड प्रयोगशाळा सुरू करण्यास शासनाची मान्यता
जिल्हय़ात कोवीड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली असून तसा शासन निर्णय मंगळवारी काढण्यात आला आहे. या प्रयोगशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
कोरोना बाधित रुग्णांची तालुकानिहाय स्थिती
कणकवली 31
कुडाळ 11
सावंतवाडी 10
मालवण 15
देवगड 09
वैभववाडी 06
वेंगुर्ला 03
संस्थात्मक अलगीकरण 23665
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 02032
अहवाल प्राप्त झालेले नमुने 01898
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 00085
निगेटिव्ह आलेले नमुने 01813
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00134
विलगीकरण कक्षात दाखल 00125
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 00075
मंगळवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 06113