ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील भाजप नेते गणेश बिडकर यांना फोनवर शिवीगाळ करत 25 लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी बिडकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रामनवमी उत्सव सुरू असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सऍप कॉल केला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मराठी आणि हिंदी भाषेत बिडकर यांना शिवीगाळ करत “लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे” अशी खंडणी देखील मागितली. तसेच पैसे दिले नाही तर तुझी बदनामी करू, असेही धमकावले. काही दिवसांपूर्वी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावे एका बांधकाम व्यावसायिकाला 3 कोटींची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार ताजा असतानाच दुसरा खंडणीचा प्रकार समोर आला आहे. सायबर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.