गोवा फॉरवर्ड मुख्य सचिवांकडे खुलासा मागणार
मडगाव : शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या महिला स्वयंसाहाय्य गटांचे थकीत असलेले 3.75 कोटी रु. शिक्षण खात्याने अजूनही फेडलेले नाहीत याकडे गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी लक्ष वेधले असून हे पैसे सरकार फेडणार कधी, असा सवाल केला आहे. माध्यान्ह आहार म्हणजे विद्यार्थ्यांचे अन्न असून हे अन्न देण्यासाठीही सरकारकडे पैसे नाहीत का, असा सवाल त्यांनी केला आहे. या सरकारकडे इव्हेंट आयोजित करण्यासाठी आणि चार्टर विमाने घेऊन देशभरात भ्रमंती करण्यासाठी मुबलक पैसा आहे, पण विद्यार्थ्यांना अन्न देण्यासाठी पैसे नाहीत, अशी टीका कामत यांनी केली आहे. कामत म्हणाले की, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. या स्वयंसाहाय्य गटांचे पैसे लवकर फेडण्याची मागणी त्यांनी केली होती. दुर्दैवाने अजूनही ते पैसे फेडले गेलेले नाहीत. याबद्दल गोवा फॉरवर्ड पक्ष मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांच्याकडे खुलासा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शिक्षण खात्याचा कारभार म्हणजे बट्ट्याबोळ झालेला आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळत नाहीत, त्यांना गणवेष दिले जात नाहीत. शिक्षण संचालकांना याबद्दल विचारले, तर त्यांच्याकडेही काही उत्तर असत नाही. त्यांनी केलेल्या सूचना शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ऐकून घेत नाहीत का, असा सवाल कामत यांनी केला आहे. शिक्षण खात्याचा कारभार जर सांभाळता येत नसेल, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.