ग्रामीण पोलिसांची कारवाई : दोघांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
गोरगरीब जनतेला देण्यात येणारे रेशनचा साठा करुन तो परस्पर विक्री करण्याच्या तयारीत असताना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी धाड टाकून तो साठा जप्त केला आहे. पिरनवाडी आणि हुंचेनट्टी येथे धाड टाकून ही कारवाई केली असून या प्रकरणी मंगळवारी दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पिरनवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
हुंचेनट्टी येथील वासीम इमामसाब मुजावर (रा. शिक्षक कॉलनी) व पिरनवाडीतील संजय सुबराव भोसले (रा. जांबोटी रोड) यांच्या घरामध्ये अवैध तांदुळसाठा असल्याची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा, बेळगाव तालुका आहार निरीक्षक जे. बी. बागोजीकोप्प यांनी ही धाड टाकली.
या दोघांच्या घरामध्ये 7 लाख 21 हजार 50 रुपये किमतीचे 31 टन 350 किलो तांदुळसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेशनसाठा करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारे अनेक ठिकाणी साठा केल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर काही रेशन दुकानदार या टोळीमध्ये सामील आहेत, अशी जोरदार चर्चा देखील सुरू आहे.