दापोली, प्रतिनिधी
Ratnagiri News : दापोली तालुक्यातील हर्णे नवानगर येथे समुद्रकिनाऱ्यावरून आणखी 8 किलो म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अंदाजे 32 लाख रुपयांचे चरस दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुरुड किनाऱ्यावर सुमारे 69 लाख रुपयांचे चरस 14 ऑगस्ट रोजी दापोली पोलिसांनी जप्त केले होते.ते अरबी समुद्रातून वाहून आलेले असण्याची शक्यता धरून पोलिसांनी रत्नागिरी समुद्र सीमेवरील सर्व किनाऱ्यावर शोधमोहीम हाती घेतली.
दापोली तालुक्यातील हर्णे नवानगर समुद्रकिनारी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी आणखी चरस असणारी 8 पाकिटे सापडली आहेत. त्याचे अंदाजे वजन 8 किलो असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रति ग्राम 400 रुपये या दराने त्याची किंमत 32 लाख रुपयांच्या घरात जात असल्याचा अंदाज दापोली पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.अशा प्रकारची शोधमोहीम सुरूच ठेवणार असल्याचे दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी स्पष्ट केले.तसेच समुद्रकिनारी असणाऱ्या गावातील नागरिकांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, अशाप्रकारे संशयास्पद काहीही आढळले तर तत्काळ दापोली पोलीस स्थानकाकडे संपर्क साधावा.
समुद्रकिनारी सापडत असणाऱ्या या अंमली पदार्थांच्या पाकिटांचा खरा मालक कोण,याचा उलगडा मात्र झालेला नाही.समुद्र वाहतुकी दरम्यान एखाद्या जहाजामध्ये अंमली पदार्थाचा साठा असल्याची गुप्त माहिती कदाचित पोलिसांना मिळाली असेल.त्या माहितीच्या आधारे अचानक पोलिसांनी अथवा अंमली पदार्थविरोधी पथकाने जहाजावर छापा टाकला असण्याची शक्यता आहे.यातून सुटण्यासाठीच जहाजावरील अंमली पदार्थ समुद्रात फेकून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा फेकून दिलेलाच साठा समुद्रांच्या लाटांबरोबर समुद्रकिनारी आढळून येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुरुड या ठिकाणी आढळलेली 15 पाकिटे, हर्णे येथे आढळलेली 8 पाकिटे तसेच काही दिवसांपूर्वी मुरुड कर्देदरम्यान आढळलेली पाकिटे तसेच गुजरात येथे समुद्रकिनारी आढळलेली पाकिटे, या सर्व पाकिटांमध्ये असणारा अंमली पदार्थ हा एकाच प्रकारचा आहे. त्यामुळे तपासात गुजरातप्रमाणे अन्य राज्यात असे काही आढळले आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक ठरणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांचीही मदत घ्यावी लागेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी रत्नागिरी येथून पोलीस पथक तसेच कस्टम डिपार्टमेंटचे पथक व दापोली पोलीस स्थानकाचे पथक यांची शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे अधिक तपास करत आहेत.