प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्याचे ऑक्टोबर 2022 चे जीएसटी महसूल संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढले असून रु. 420 कोटी झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2021 मध्ये जीएसटी संकलन रु. 316 कोटी झाले होते.
वाहतूकमंत्री आणि जीएसटी राष्ट्रीय मंडळाचे सदस्य माविन गुदिन्हो यांनी गोव्यासाठी वाढत असलेल्या जीएसटी महसूल संकलनाचे स्वागत करून सांगितले की, गोव्याचे संकलन वाढणे ही स्वागतार्ह बाब असून एकंदरित कलही तसाच आहे. याच जीएसटीला सुरुवातीस विरोध होऊन त्यावर टीकाही करण्यात आली होती. परंतु आता जीएसटी संकलन म्हणजे एक चांगली सुधारणा होती, असे सिद्ध झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भविष्याचा वेध घेऊन जीएसटी संकलन सुरु केले. त्याचा फायदा गोव्याला तसेच इतर राज्यांना महसुली स्वरुपात मिळत असल्याचे समोर आले आहे. त्याबद्दल आपण मोदी आणि सीतारामन यांचे अभिनंदन करतो, असे गुदिन्हो यांनी नमूद केले.
ऑक्टोबर 2022 मधील जीएसटी संकलन हे चालू वर्षातील दुसऱया क्रमांकाचे सर्वात मोठे आहे. एप्रिल 2022 मध्ये यापेक्षा जास्त संकलन झाले होते. यापुढे जीएसटी महसुली संकलन वाढत जाणार असल्याची अपेक्षा त्यांनी प्रकट केली. आर्थिक क्षेत्रात ज्या सुधारणा झाल्या आणि केल्या त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचा दावा गुदिन्हो यांनी केला आहे.