सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी गेलेल्या भाविकांना उलटी-जुलाब : शासकीय ऊग्णालयात 20 जणांवर उपचार सुरू
खानापूर : सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी गेलेल्या मोदेकोप येथील 40 भाविकांना उलटी-जुलाबाची बाधा झाल्याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील 20 जणांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याबाबत समजलेली माहिती अशी, मोदेकोप येथील ग्रामस्थ प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवारी यल्लम्मा यात्रेसाठी ट्रकमधून सौंदत्ती येथे गेले होते. रविवारी दुपारी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर धार्मिक विधी आटोपून जेवण झाल्यानंतर अचानक सर्वांना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. मोदेकोप येथे परत आल्यानंतर सर्वांना अधिकच त्रास होऊ लागल्याने त्यातील 20 जणांना येथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. या सर्वांवर डॉ. प्रभू तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येत आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मोदेकोप येथील 40 जणांना याचा त्रास झाला आहे.
शासकीय रुग्णालयात सुनंदा खेमाजी पाटील, खेमाजी रामचंद्र पाटील, रामाक्का ओमाण्णा पेडणेकर, एकनाथ बळीराम कुलम, सुभद्रा निंगाप्पा कुलम, तुळजाबाई बळीराम कुलम, राधिका मारुती कार्वेकर, सरिता अशोक गुरव, आकाश अशोक गुरव, संध्या संजय कार्वेकर, रामाक्का नारायण कार्वेकर, वीना तुकाराम वाडेकर, शांता तानाजी लोकोळकर, राधिका मारुती कार्वेकर, पार्वती महादेव कार्वेकर, जिजा तुकाराम बिर्जे, मंगला चंद्रकांत खणगावकर, लक्ष्मी गणपती तोराळकर, सावित्री मारुती वाडेकर, मारुती रामचंद्र वाडेकर यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत तर आनखी 20 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. प्रभू तोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांवर तातडीने उपचार केल्याने सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. यावेळी माजी जि. पं. सदस्य नारायण कार्वेकर, म. ए. समितीचे नेते प्रकाश चव्हाण, यशवंत बिरजे, मुरलीधर पाटील, गोपाळ देसाई, भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी रविवारी रात्री दवाखान्यात रुग्णांची विचारपूस केली.