जेरुसलेम
जागतिक स्तरावर कोरोना महामारीचा सामना करण्यामध्ये इस्रायल या देशाने आघाडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायल देशातील 5 लाख लोकांना सरकारने अलीकडेच चौथा कोरोनाप्रतिबंधक डोस दिला आहे. जगभरामध्ये ओमिक्रॉनची वाढती संख्या लक्षात घेऊन इस्रायलने लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून लसीकरणाला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये हा देश चौथा डोस देण्यामध्ये सर्वात पुढे राहिला असल्याची बाब समोर आली आहे. इतर देशांनी आत्ताच कुठे कोरोना प्रतिबंधक तिसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये भारतानेही आता आपले पाऊल टाकले आहे. इस्रायल सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मागच्या महिन्यामध्ये सर्वाधिक कमकुवत लोकांना दुसरा बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 60 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू केले. अतिरिक्त बूस्टर डोसमुळे संक्रमण बऱयापैकी नियंत्रणात राहणार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जवळपास 2 लाख 60 हजार इतके सक्रिय रुग्ण याबाबतीत देशांमध्ये आढळून आले आहेत.