भारत बायोटेकने सांगितले कारण
वृत्तसंस्था/ हैदराबाद
भारत बायोटेक कंपनीने कोरोना व्हॅक्सिन कोव्हॅक्सिनसंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. कंपनीकडील कोव्हॅक्सिनचे 5 कोटी डोस 2023 च्या प्रारंभी एक्स्पायर होणार आहेत. मागणी नसल्याने या लसीकरता कुठलाच खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती आहे. यातून मोठे नुकसान होण्याची भीती असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आम्ही आमच्या पुरवठय़ाची जबाबदारी पूर्ण केली आहे. लसीच्या मागणीत झालेली घट पाहता तात्पुरत्या स्वरुपात याचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे सध्या पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध आहेत. तर 5 कोटीहून अधिक डोस एक्स्पायर होण्याच्या मार्गावर आहेत. आगामी काळात कंपनी प्रलंबित सुविधा देखभाल, प्रक्रिया आणि सुविधा अनुकूलन हालचालींवर लक्ष केंद्रीत करणार आहे. कोरोना महामारीच्या स्वरुपातील आरोग्य आणीबाणीदरम्यान कंपनीच्या सर्व सुविधांना कोव्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी त्यानुसार बदलण्यात आले होते. मागील वर्षी सातत्याने याचे उत्पादन झाले होते असे कंपनीकडून सांगण्यात आले.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत आतापर्यंत कोव्हॅक्सिनसह अन्य लसींचे 219.71 कोटी डोस देण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर संक्रमण दरात वेगाने घसरण होत असल्याने कोव्हॅक्सिनच्या निर्यातीला फटका बसला आहे. कोरोना महामारीला आता जागतिक स्तरावर धोका मानले जात नसल्याचे चित्र आहे. तर एप्रिल 2022 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून कोव्हॅक्सिनचा पुरवठा रोखला होता.