तयारी अंतिम टप्प्यात, देशात पहिल्यांदाच आयोजन
प्रतिनिधी /पणजी
देशात पहिल्यांदाच आयोजित केलेला पर्पल फेस्त हा गोव्यात साजरा होत आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, 6 जानेवारीला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. दिव्यांग बांधव आपली कला, क्रीडा व साहस या उत्सवात दाखविणार असल्याने या उत्सवाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
गोवा समाजकल्याण संचालनालय, गोवा राज्य दिव्यांग आयुक्त व गोवा मनोरंजन संस्थेमार्फत आयोजित होणारा हा उत्सव राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या उत्सवासाठी सुमारे 4 हजार नागरिकांची नोंदणी झालेली आहे. दिव्यांग बांधवांसाठी साधन-सुविधा निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या संपूर्ण उत्सवासाठी सुमारे 5 कोटीं रुपये खर्च होणार आहेत.
पणजीतील आयनॉक्स थिएटर परिसर, मॅकिनेज पॅलेस आणि जुने जीएमसी येथे कामे हाती घेण्यात आली असून, ती अंतिम टप्प्यात आहेत. या ठिकाणी जागा कायमस्वरूपी सुलभता-अनुकूल बनवण्याचे प्रयत्न झालेले आहेत. दिव्यांगांसाठी घातलेले रॅम्प हे या ठिकाणी कायमस्वरुपी राहणार आहेत. पर्पल उत्सवातील काही कार्यक्रम हे या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून, धारबांदोडा येथेही स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याशिवाय जुने गोवे व इतर ठिकाणी उत्सवातील कार्यक्रम होतील.
किनाऱयांवर दिव्यांना सुविधा
काही किनाऱयांवर दिव्यांग बांधवांना प्रवेश करण्यासाठी पायाभूत सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत. किनाऱयापर्यंत व्हीलचेअर जाण्यासाठी रॅम्प व विशेष मोटार असलेल्या व्हीलचेअर्स यांचाही समावेश आहे.. याशिवाय ई-रिक्षाचाही वापर करण्यात येणार आहे.
मिरामा येथे बीच मॅट्सची व्यवस्था
मिरामार समुद्रकिनारा, क्रीडा उपक्रमांची ठिकाणे, समुद्रपर्यटनासाठी बोट इत्यादी सोयी उपलब्ध करून देण्याबरोबरच मीरामार किनाऱयावर व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी खास बीच मॅट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीलचेअर वापरकर्त्यांना वाळू आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी खास फ्लोटिंग व्हीलचेअर आणि बीच बग्गीही उपलब्ध असतील.
अशा आहेत सोयी-सुविधा
1. कार्यक्रम होणाऱया सर्व इमारतींना रॅम्पची तरतूद केलेली आहे. स्थळाची तयार केलेली पर्यावरणीय सुलभता, दिव्यांगांसाठी भूपृ÷ावरील स्पर्शासंबंधीचे संकेतक, प्रवेशयोग्य शौचालय सुविधांची तरतूद आणि सुधारणा, सभागृहांमध्ये व्हीलचेअर पार्किंगची जागा, तात्पुरत्या रॅम्पची सोय केली आहे. व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी पहिल्या मजल्यावर प्रवेश करण्यासाठी, जिना चढण्यासाठी व्हीलचेअर.
2. वाहतूक सुलभता व्हावी यासाठी पोर्टेबल रॅम्प आणि व्हीलचेअर वापरकर्त्यांच्या वाहतुकीसाठी वाहनांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत.
3. माहिती सुलभपणे प्राप्त व्हावी यासाठी QR (क्यू आर) कोडची एक अनोखी प्रणाली जी ऑडिओ माहितीशी जोडलेली आहे. या प्रणालीमुळे स्मार्ट फोनवर माहिती उपलब्ध होते. प्रत्येक स्टॉल आणि ठिकाणावर क्यूआर कोडची व्यवस्था आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना सर्व माहिती ऑडिओमध्ये मिळू शकेल.