राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हात्रे यांचे प्रतिपादन : शहर महिला राष्ट्रवादीच्या बैठकीत मार्गदर्शन
प्रतिनिधी/कोल्हापूर
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी निवेदनही देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हात्रे यांनी केले.
कोल्हापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक बुधवारी येथील शिवाजी स्टेडियममधील कार्यालयात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना म्हात्रे म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने कोल्हापूर शहरात पक्षवाढीसाठी कार्य करावे, त्यासाठी महिलांसाठी आवश्यक असणारे उपक्रम राबवावेत, महिलांच्या प्रश्नांबाबत जागृती, प्रबोधन करण्यावर लक्ष द्यावे, महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर आहे, त्यासाठी उपाययोजना कराव्यात. शासनस्तरावर पाठपुरावा करावा. महिला मतदारांमध्ये राष्ट्रवादीची प्रतिमा आणखीन उंचविण्याच्या दृष्टीने शहर कार्यकारिणीने काम सुरू करावे.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकांप्रमाणेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आसावे, यासाठी आमच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. निवेदनही देण्यात येणार आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले.
शहर महिलाध्यक्षा जहिदा मुजावर यांनी महिला आघाडीच्या कार्याचा आढावा घेतला. पक्षाचा वाढता व्याप पाहता मोठय़ा कार्यालयाची आवश्यकता आहे. त्यासाठी पक्षांच्या नेत्यांशी म्हात्रे यांनी चर्चा करावी, असे सांगितले.
स्वागत व प्रस्तावना सुरेखा कांबळे यांनी केले. सौ. सामंत, स्वाती काळे यांची भाषणे झाली. आभार सायली महाडिक यांनी मानले. बैठकीला सुनिता राऊत, शितल तिवडे, पूजा साळोखे, सुमन वाडेकर, मीनाक्षी डोंगरसाने, रेहाना नागरकट्टी, मंगल कट्टी, धनश्री जाधव, प्राजक्ता आमले, संध्या भोसले, अलका वाघेला, बद्रुनिसा शेख, बिल्कीस सय्यद, शमा महात, आरती खोंद्रे यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.