सीआरझेडचे उल्लंघन करुन उभ्या बेकायदा बांधकांमावर कारवाई कधी? पोलिसांच्या कारवाईवर जनता साशंक
गिरीश मांद्रेकर /म्हापसा
भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगट खूनप्रकरणामुळे गोव्याची अमलीपदार्थावरुन खूप बदनामी झाली आहे. ज्या रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली त्या बेकायदेशीर ‘कर्लिज’ रेस्टॉरंट जमिनदोस्त करण्याचे काम रविवार तिसऱया दिवशीही सुरु होते. गेल्या आठ वर्षांपासून या रेस्टॉरंट विरोधातील याचिका न्यायालयात होती. कर्लिजसारखेच उत्तर गोव्यात अन्य 54 बेकायदेशीर आलिशान हॉटेल्स, बार ऍण्ड रेस्टॉरंट, क्लब सीआरझेडचे उल्लंघन करुन उभी आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज व्यवहाराचे मूळापासून उच्चाटन करण्याची घोषणा केली पण ड्रग्ज पॅडलर आणि पोलिसांची मिलीभगत आहे. पोलीस ड्रग्जचे उच्चाटन करतील काय? असे प्रश्न राज्यातील जनतेसमोर उभी राहिली आहेत.
कर्लिज प्रकरणानंतर आता किनारी भागातील विविध प्रकरणे उघड होऊ लागली आहेत. त्यात सीआरझेडचे उल्लंघन करुन उभी असलेली बेकायदेशीर बार ऍण्ड रेस्टॉरंटवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आरटीआय कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार उत्तर गोव्यात अशी 54 छोटी – मोठी बार ऍण्ड रेस्टॉरंट, हॉटेल्स बेकायदेशीरित्या उभी आहेत. त्यांच्यावर कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
सरकारच्या मनात आले तर सर्व शक्य!
थेट दिल्लीपर्यंत कनेक्शन असलेल्या कर्लिज बार ऍण्ड रेस्टॉरंटवर कारवाई होते. अतिमहनिय व्यक्तींची येथे ये-जा असायची. असे असताना सरकारने कोणाच्याही दबावाला न जुमानता कर्लिजवर कारवाई करण्यात आली यातून एक स्पष्ट होते की सरकारच्या मनात आले तर सर्व काही शक्य आहे. न्यायालयाने 15 दिवसांच्या आत कर्लिजवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र प्रशासनाने रात्री 11 वा. आदेश काढून दुसऱया दिवशी सकाळी 7 वा. सदर बांधकाम जमिनदोस्त करण्यास सुरुवात केली. राज्याची बदनामी होत असल्याने सरकारने लगेच सूत्रे हलवून कारवाई केली तशीच कारवाई इतर शॅक्स, बार ऍण्ड रेस्टॉरंटवर का नाही? तेथे पण सोनाली फोगटसारख्या घटना घडण्याची सरकार वाट पाहत आहे का? जेथे रेर्व्ह पाटर्य़ा होतात अशा हॉटेल्स, रेस्टॉरंटवर कारवाई का होत नाही आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिसांना कोटींच्या घरात किनारपट्टीवरील मलिदा
किनारपट्टीवरील शॅक्स, हॉटेल्स, बार ऍण्ड रेस्टॉरंट, क्लब, मसाज पार्लर आदीकडून पोलिसांना मोठय़ा प्रमाणात महिन्याकाठी हप्ता येत असल्याचे उघड झाले आहे. आलिशान हॉटेल्सकडून आठवडय़ाला दोन लाख, पाटर्य़ांसाठी शॅक्स वा बार ऍण्ड रेस्टॉरंटकडून 50 ते 80 हजार रु., मसाज पार्लर 30 ते 40 हजार, काहींकडून महिन्याला, आठवडय़ाला तर काही प्रत्येक दिनी पार्टीसाठी ठराविक रक्कम देतात. त्यामुळे कुणीही पोलीस या पाटर्य़ांकडे लक्ष देत नाही, कोणी तक्रार केल्यास पोलीस तक्रारदारांची नावे आयोजकांना देतात व नंतर आयोजकांकडून तक्रारदाराला धमकी सत्र सुरु होते. अन्यथा पोलिसच रितसर तक्रार द्या म्हणून तक्रारदारास पोलीस स्थानकात बोलावितात. त्यामुळे आपल्यास नाहक त्रास नको म्हणून कोणी तक्रार देत नाही. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ता कोटीच्या घरात जातो. त्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.
कारवाई न करण्याच्या अटीवर अधिकारी हणजूणात
दरम्यान, एका पोलीस अधिकाऱयांने दिलेल्या माहितीनुसार, हणजूण पोलीस स्थानकात अधिकारी आणण्यासाठी एका राजकीय व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. एरवी किनारपट्टी भागात येण्यासाठी अधिकाऱयाला 40 ते 50 लाखापर्यंत बोली लावली जाते मात्र राजकीय नेत्याने कारवाई करण्याच्या अटीवर एका अधिकाऱयाला हणजूणात आणल्याचे वृत्त आहे.
आणि किती मृत्यूंची वाट पाहणार?
यापूर्वी स्कार्लेट मूत्यूप्रकरण आणि आता सोनाली फोगट खूनप्रकरणातून राज्यात अमलीपदार्थाचा मोठय़ा प्रमाणात व्यवहार होतो असे सिद्ध झाले आहे. गोव्यातील काही धेंडे यात गुंतलेले आहेत आणि त्यांची पाळेमुळे आता ग्रामीण भागातही पोहोचलेली आहेत. जेव्हा अतिमहनिय लोकांचे मृत्यू होतात तेव्हाच सरकारला जाग येते मात्र ड्रग्ज ओव्हरडोसमुळे दरवर्षी मरणाऱया पर्यटकांचे काय? याकडे कोण लक्ष देणार? अशा ड्रग्ज पॅडलरांवर, रेर्व्ह पार्टी आयोजकांवर कारवाई केव्हा होणार? सरकार अजून किती मृत्यूंची वाट पाहत आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रविवारीही कर्लिज मोडतोड सुरु
दरम्यान, रविवारी तिसऱया दिवशीही वादग्रस्त कर्लिजवर कारवाई सुरु होती. तीन दिवसात सुमारे 50 टक्के काम जमिनदोस्त करण्यात आले आहे. सर्वे क्र. 42/10 मधील भाग वगळता सर्व बेकायदेशीर भाग जमिनदोस्त करण्यात येणार असून सोमवारीही ही कारवाई सुरु राहाणार आहे. पोलीस याकडे जातीने लक्ष ठेवून आहेत.