ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नागपुरातील एका व्यापाऱ्याला ऑनलाइन गेम्सच्या विखळ्यात अडकवून तब्बल 58 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी गोंदियातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या घरातून पोलिसांनी 18 कोटी रुपयांची रोकड, 15 किलो सोने आणि 200 किलो चांदी जप्त केली आहे.
अनंत उर्फ सोन्दू नवरतन जैन असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अनंत जैन याने नागपुरातील बडय़ा व्यापाऱ्याला ऑनलाईन गेमिंग अॅपवर 24 तास बेटींग करून करोडो रूपये कमावता येतील असे प्रलोभन दिले. त्यानंतर त्यांना ऑनलाईन बेटींग / गेमिंग लिंकचे युझरनेम, पासवर्ड पाठवून त्यावर दिलेले पॉईंट परत मिळणार नाहीत, असे सांगून बेटींग करण्यासाठी मजबूर केले. ऑनलाईन गेम्स आणि बेटींगची सवय लावून या व्यापाऱ्याला विखळ्यात अडकविण्यात आले. तक्रारदार व्यापारी आपले पैसे रिकव्हर करण्यासाठी त्यांच्या मित्रांकडून उधार पैसे घेवून आरोपीच्या सांगण्यावरून बेटींग करीत होते. परंतु, त्यांना कधीही फायदा झाला नाही. 58 कोटी गमावल्यानंतर त्यांना आरोपींचा ट्रॅप लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गोंदिया येथे राहात असलेल्या आरोपीच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरातून पोलिसांनी आत्तापर्यंत 18 कोटींची रोकड, 15 किलो सोनं आणि 200 किलो चांदी जप्त करत त्याला अटक केली आहे.