सांगरूळ / वार्ताहर
सांगरूळ ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या आहेत .गावाच्या विकासाबरोबरच गावातील नागरिकांच्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या आहेत .महिला आरोग्य व्यवस्थापनातून नाममात्र किमतीत महिलांना सॅनिटरी नॅपकिन पॅड उपलब्ध करून देण्याचा उपक्रम नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद आहे . असे प्रतिपादन कोल्हापूरच्या परीक्षावधीन सहाय्यक . पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी केले .सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने महिला आरोग्य व्यवस्थापनातून गावात सुरू केलेल्या सॅनिटरी नॅपकिन पॅड मशीनच्या उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या .अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच शितल खाडे होत्या.
यावेळी बोलताना अन्नपूर्णा सिंह म्हणाल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकास कामे सुरू असतात पण सांगरूळ ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण योजना राबवत गावातील सर्वसामान्य महिलांना दोन रुपयांना मात्र किमतीत सॅनिटरी नॅपकिन पॅड उपलब्ध करून दिले आहे. गावाच्या विकासाबरोबर महिलांच्या आरोग्यासाठी चांगल्या योजना गावात राबवल्या जातात हे कौतुकास्पद आहे.
स्वागत व प्रास्ताविक करताना ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे यांनी गावात सध्या ग्रामपंचायत व बाजारवाडा अशा दोन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन पॅड मशीन सुरू केले असून याला गावातील महिलांच्या कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .भविष्यात गरजेनुसार मशीनची संख्या वाढविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस असल्याचे सांगितले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच शितल खाडे यांनी गावाच्या विकासाबरोबरच भविष्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात महिला विकासाच्या विविध योजना राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समितीच्या सदस्या अर्चना खाडे ग्रामपंचायत सदस्या उज्वला लोंढे, सुरेखा तोरस्कर, अश्विनी यादव, विद्या चाबूक, साक्षी म्हेतर, मधुरा खाडे, गीतांजली कासोटे, रेषा आंबी यांचेसह आशा व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या.