बद्रीनाथ धाममध्ये 8 मेपासून घेता येणार दर्शन
वृत्तसंस्था / रुद्रप्रयाग
केदारनाथ धाममध्ये यंदा 6 मे रोजी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांपासून दर्शन घेता येणार आहे. मंगळवारी महाशिवरात्रीच्या वेळी पारंपरिक पूजेनंतर दर्शन सुरू करण्याची तिथी आणि मुहूर्त काढण्यात आला. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. हरीश गौड यांनी याची माहिती दिली आहे. उखीमठपासून केदारनाथची उत्सव यात्रा 2 मे रोजी केदारनाथसाठी निघणार आहे. 8 मे रोजी बद्रीनाथ धाममध्ये दर्शन सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उखीमठमधून निर्धारित कार्यक्रमानुसार भगवान श्री केदारनथाची पंचमुखी उत्सव पालखी 2 मे रोजी पंचकेदार गद्दी स्थळ ओंकारेश्वर मंदिरापासून केदारनाथसाठी प्रस्थान करणार आहे. भैरव पूजन उखीमठमध्ये एक दिवस आधी म्हणजेच 1 मे रोजी होणार आहे. पंचमुखी पालखी 2 मे रोजी गुप्तकाशी, 3 मे रोजी फाटा, 4 मे रोजी गौरीकुंड तर 5 मे रोजी केदारनाथ धाममध्ये पोहोचणार आहे. 6 मे रोजी शुक्रवारी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी केदारनाथ धाममध्ये दर्शन घेता येणार आहे.
उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात शिवरात्रीच्या पवित्र दिनी आयोजित संक्षिप्त धार्मिक सोहळय़ात मंदिर समितीचे अध्यक्ष रावल भीमाशंकर यांच्या उपस्थितीत पूजा-अर्चना, पंचांग गणनेनंतर चालू वर्षात केदारनाथ यात्रेच्या दर्शनाची तिथी घोषित करण्यात आली.