विटा पोलिसांची कारवाई
विटा प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीत साहित्य चोरी करणाऱ्या टोळीस पकडण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सहा लाख 55 हजार 840 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकाश विजेश गोसावी (25), रवींद्र तुकाराम गोसावी (33), विनोद रामाप्पा गोसावी (30), अनिल रामाप्पा गोसावी (25, सर्व रा. म्हैशाळ, ता. मिरज) अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत. त्यांना अटक केली असून न्यायालयाने हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
याबाबत पोलिस निरीक्षक डोके यांनी दिलेली माहिती अशी, खानापूर तालुक्यातील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमधील बंद गोडावूनचा पत्रा उचकटून गोडावूनमधील एक लाख 65 हजार रूपये किंमतीच्या पॉलीमार बॅगा चोरी झाल्याची फिर्याद रोहन रामचंद्र जाधव (रा. सावरकरनगर, विटा) यांनी 10 सप्टेंबर रोजी विटा पोलिसांत दिली होती. गुह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिस प्रमोद साखरपे यांना गोपनीय खबऱ्याद्वारे वरील संशयितांनी चोरी केल्याची माहिती मिळाली. सापळा रचुन चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातील तीन लाख 72 हजार 840 रूपयांच्या 128 पॉलीमर बॅगा, अडीच लाखाची चारचाकी, वीस हजाराचे लोखंडी स्क्रॅप, 11 हजार 500 रूपयांची वेल्डींग मशीन, अडीच हजाराचे लाकडी टेबल असा एकूण सहा लाख 55 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक डोके यांनी सांगितले.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके प्रशांत चव्हाण, अनिल जाधव, विशाल येळेकर, सागर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उत्तम माळी, प्रमोद साखरपे, अमोल कराळे, महेश देशमुख, हेमंत तांबेवाघ, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, गणपत गावडे, अभिजीत वाघमोडे, सयाजी पाटील, विशाल पाटील, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, अमित मोरे, श्रीधर बागडी, स्वप्नील नायकवडे यांच्या पथकाने केली.