केवळ 3 लसींचे तिसऱया टप्प्यातील निष्कर्ष प्रसिद्ध : अमेरिका, ब्रिटनमध्ये लसीकरणास प्रारंभ
कोरोना विषाणूपासून वाचविण्यासाठी लसनिर्मितीची चढाओढ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रशियाने दोन तर चीनने 4 लसींना आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. अमेरिकेची कंपनी फायजरच्या लसीला ब्रिटन, अमेरिका, युएई, कॅनडा, बहारीनसमवेत काही देशांनी मंजुरी दिली आहे. भारतातही संबंधित प्रक्रिया गतिमान झाली आहे.
7 लसींना मंजुरी मिळाली असली तरीही आतापर्यंत केवळ 4 कंपन्यांनीच तिसऱया टप्प्यातील निष्कर्ष प्रसिद्ध पेले आहेत. त्यांच्या लसीचा प्रभावोत्पादकता दर 90 टक्के किंवा त्याहून अधिक असल्याचे सांगितले आहे. हा दरच कुठल्याही लसीला मंजुरी देण्याचा आधार असतो.
लस चाचणी ही एक दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. संशोधक लसीच्या चाचणीत सामील निम्म्या लोकांना डोस देतात, तर निम्म्या जणांना प्लेसिबो म्हणजेच सलाइन देतात. काही महिन्यांपर्यंत स्वयंसेवकांवर देखरेख ठेवून विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. रक्तचाचणीद्वारे शरीरात अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत की नाही हे पाहिले जाते.
ऑक्सफोर्ड विद्यापीठ/एस्ट्राजेनेका
तिसऱया टप्प्यातील चाचणीत ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस (कोविशिल्ड) 90 टक्क्यांपर्यंत प्रभावोत्पादक आढळली आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कोविशिल्डचे किमान 10 कोटी डोस तयार होणार आहेत. सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी 40 लाख डोस तयार झाल्याची माहिती दिली आहे. कोविशिल्डचा एक डोस बाजारात 500 ते 600 रुपयांमध्ये मिळणार आहे.
फायजर अन् बायोटेक
अमेरिकेतील औषध कंपनी फायजर आणि जर्मनी कंपनी बायोएनटेकची संयुक्त लस तिसऱया टप्प्यात 95 टक्के प्रभावोत्पादक आढळली आहे. कंपनीनुसार लस वयोवृद्ध लोकांमध्येही उपयुक्त ठरली आहे. या लसीचे कुठलेच दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. फायजर डिसेंबरपर्यंत लसीचे 5 कोटी डोस तयार करणार आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, बहारिनने यापूर्वीच या लसीला मंजुरी दिली आहे. कंपनीने भारतातही मंजुरीसाठी प्रयत्न चालविले आहेत.
मॉडर्ना
अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनी मॉडर्नाने स्वतःची लस 94.5 टक्क्यांपर्यंत प्रभावोत्पादक ठरल्याचा दावा केला आहे. हा दावा अंतिम टप्प्यातील चाचण्यांच्या आधारावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानातही 30 दिवसांपर्यंत सुरक्षित राहते. तिसऱया टप्प्यातील चाचणीत 30 हजारांपेक्षा अधिक जणांना सामील करण्यात आले होते.
गामालेया रिसर्च इन्स्टीटय़ूट
रशियात निर्माण स्पुतनिक-5 ही लस चाचण्यांदरम्यान 95 टक्के प्रभावोत्पादक आढळून आली आहे. क्लीनिकल ट्रायलच्या दुसऱया प्रारंभिक विश्लेषणात ही बाब समोर आली आहे. पहिला डोस दिल्याच्या 28 दिवसांनी या लसीने 91.4 टक्के प्रभावीपणा दाखविला होता. रशियात ही लस मोफत उपलब्ध होणार आहे. अन्य देशांसाठी याची किंमत 700 रुपयांपेक्षा कमी असेल.