सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. आर. शाह निवृत्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे चौथे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. आर. शाह सोमवारी निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक निकाल देणाऱ्या न्यायाधीशांपैकी शाह हे एक आहेत. सुमारे चार वर्षांत त्यांनी 712 निवाडे दिले. अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह दिल्ली सरकार विऊद्ध एलजी प्रकरणांचा निर्णय घेणाऱ्या घटनापीठामध्येही त्यांचा सहभाग होता.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या उपस्थितीत सोमवारी परंपरेनुसार न्यायमूर्ती शाह यांना शुभेच्छापर निरोप देण्यात आला. याप्रसंगी बारच्या विविध सदस्यांनी न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. सरन्यायाधीशांनीही त्यांच्या कार्याचे आणि न्यायालयीन यंत्रणेतील योगदानाचे कौतुक केले. न्यायमूर्ती शाह यांच्यासोबत आम्ही अत्यानंदाने काम केले. फौजदारी खटले असोत किंवा जीएसटीचा नवा कायदा असो, नवीन आव्हानासाठी ते नेहमी तयार असायचे. मी त्यांना निर्णय लिहिण्यासाठी पाठवले तर ते 48 तासांत माझ्या डेस्कवर निर्णयाची कॉपी पाठवून देत असत. आम्ही त्यांच्याकडे अतिशय जबाबदारीने आणि विश्वासाने कोणतेही काम बिनधास्तपणे सोपवत होतो, असे प्रतिपादन सरन्यायाधीशांनी केले.
निरोपपर भाषणाचा गाण्याने समारोप
न्यायमूर्ती एम. आर. शाह यांनीही आपल्या शेवटच्या भाषणात सहकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. माझ्या कार्यकाळात मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो, असे ते म्हणाले. मी नेहमीच माझ्या कामाला पूजेच्या रूपात घेतले. मी माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांचाही आभारी आहे, असे शाह म्हणाले. याप्रसंगी न्यायमूर्ती शाह कोर्टरूममध्ये भावूक झाले. मी निवृत्त होणारा माणूस नाही आणि आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार असल्याचे सांगत ‘कल खेल में हम हो ना हो, गर्दीश में तारे रहेंगे सदा’ हे गाणे गात त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.