वृत्तसंस्था/ बाकू (अझरबेजान)
आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या (आयएसएसएफ) 2023 च्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने एकूण 4 पदकांची कमाई करुन दुसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत भारताची महिला नेमबाज मानिनी कौशिकने महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन (थ्री पी) प्रकारात सहावे स्थान घेतले. पहिल्यांदाच मानिनीने वरिष्ठ गटाचे प्रतिनिधित्व करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
या स्पर्धेत पदक तक्त्यात चीन पहिल्या स्थानावर असून त्यांनी 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदक मिळविले आहे. सदर स्पर्धेत 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या सरबज्योत सिंग आणि टी. एस. दिव्या यांनी सुवर्णपदक घेतले. त्याचप्रमाणे भारताच्या हृदय हजारीका आणि नॅन्सी मंडोत्रा यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत प्रत्येकी 1 रौप्यपदक पटकाविले. भारताच्या रिदम सांगवानने महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत 29 वर्षे अबाधित राहिलेला विश्वविक्रम मागे टाकताना 595 गुण पात्रफेरी अखेर नोंदविले. बल्गेरियाची नेमबाज डायना लोरगोव्हाने 1994 साली नोंदविलेला 594 गुणांचा विक्रम रिदम सांगवानने मोडीत काढला. आयएसएसएफची अंतिम टप्प्यातील स्पर्धा आता ब्राझीलमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. महिलांच्या 50 मी. रायफल थ्dरी पोझिशन प्रकारात ब्रिटनच्या मॅकेनटोशने 467.0 गुण नोंदवित सुवर्णपदक मिळविले. तर पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात चीनच्या ली यहाँगने सुवर्णपदक मिळविले.