पुतीन यांना भेटण्यासाठी निर्जंतुकीकरण अनिवार्य : जगभरात आतापर्यंत 82,87,293 कोरोनाबाधित
जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 4 लाख 46 हजार 667 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तर बाधितांचा आकडा 82,87,293 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत 43 लाख 41 हजार 848 बाधितांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या भेटण्यापूर्वी अधिकाऱयांना डिसइन्फेक्ट टनेलमधून जावे लागत आहे. हे टनेल रशियाच्या कंपनीने निर्माण केले आहे. देशात 24 तासांत 7,943 नवे रुग्ण सापडले असून 194 जणांना जीव गमवावा लागला आहे. दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये दारिद्रय़ात जगणारे 8 कोटींपेक्षा अधिक लोक उपासमारीच्या वाटेवर आहेत. महामारीमुळे या देशांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या देशांमधील नागरिकांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय एकजूट व्हावी असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने पेले आहे.
बीजिंग : 31 नवे रुग्ण
चीनमध्ये कोरोना संसर्गाचे 44 नवे रुग्ण सापडले आहेत. बीजिंग शहरात 31 नवे बाधित सापडले आहेत. याचदरम्यान बीजिंग विमानतळाने 1,255 विमानोड्डाणे रद्द केली आहेत. शहरात संसर्गाची दुसरी लाट समोर आल्यावर स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहराच्या काही भागांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
इटलीत 34 बळी वाढले
इटलीत कोरोना महामारीमुळे मागील 24 तासांत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या तुलनेत काहिशी घट झाली आहे. दिवसभरात 210 नवे बाधित सापडले आहेत. इटलीत कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 34,405 जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना बळीप्रकरणी अमेरिका, ब्राझील आणि ब्रिटननंतर इटलीचा चौथा क्रमांक आहे. देशात आतापर्यंत 2,37,500 बाधित सापडले आहेत.
अमेरिका : 3 प्रांतांमध्ये संकट
अमेरिकेच्या ऍरिझोना, फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये कोरोनाच्या प्रतिदिन नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. फ्लोरिडात दिवसभरात 2,783 तर टेक्सामध्ये 2,622 आणि ऍरिझोनात 2,392 रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेच्या तिन्ही प्रांतांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ओक्लाहोमा येथून प्रचारसभेला प्रारंभ करणार आहेत. या प्रचारमोहिमेत गर्दी जमल्याने रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
होंडुरास : अध्यक्ष बाधित
होंडुरासचे अध्यक्ष ऑरलँडो हर्नांडेज आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. दोन सहकाऱयांमुळे हर्नांडेज यांना ही लागण झाली आहे. अध्यक्षांची प्रकृती सध्या स्थिर असून घरातूनच ते कामकाज सांभाळणार आहेत. देव, देशातील डॉक्टर्स आणि औषधांवर माझा पूर्ण विश्वास असल्याचे हर्नांडेज यांनी म्हटले आहे. देशात आतापर्यंत 9,600 रुग्ण सापडले असून 330 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवडय़ातच तेथे 3 महिन्यांच्या टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्यात आली आहे.
ब्राझील : 45 हजार बळी
दक्षिण अमेरिका खंडातील देश ब्राझीलमध्ये बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. तेथे 24 तासांत 34 हजार 918 नवे रुग्ण सापडले असून 1,282 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील रुग्णांचा एकूण आकडा 9,28,834 झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्येच सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत 45,456 बाधितांना जीव गमवावा लागला आहे.
ऍटर्नी जनरल बाधित
अमेरिकेच्या इलिनियोसचे ऍटर्नी जनरल क्वामे राउल यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. राउल यांनी स्वतःचे विलगीकरण केले आहे. प्रांतात 1.33 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
इस्रायल : 258 नवे रुग्ण
इस्रायलमध्ये दिवसभरात 258 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील रुग्णांचे प्रमाण वाढून 19,495 झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत 302 जणांचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी इस्रायलच्या रोजगार सेवेने आकडेवारी प्रसिद्ध करत एप्रिलच्या अखेरीस देशात असलेला बेरोजगारी दर 27.5 टक्के मे महिन्याच्या अखेरीस 23.5 टक्क्यांवर आला आहे.
स्पेन : ब्रिटिशांचे क्वारंटाईन
देशात दाखल होणाऱया ब्रिटिश प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय स्पेन घेणार आहे. स्पेनमध्ये पुढील आठवडय़ापासून युरोपीय देशांसाठी सीमा खुली केली जाणार आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 2,91,408 बाधित सापडले असून 27,136 जणांना जीव गमवावा लागला आहे.