वंशद्वेषी हल्ल्यांची पार्श्वभूमी : सुरक्षेच्या कारणास्तव उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत भारतीयांच्या विरोधात वंशद्वेषी हिंसेच्या घटना वाढल्यामुळे दोन वर्षांत 80 हजार भारतीयांनी नवे गन लायसन्स प्राप्त केले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या सुमारे 40 लाख भारतीयांमध्ये यापूर्वी बंदूक बाळगण्याचा ट्रेंड नव्हता. दोन वर्षांपूर्वी केवळ 40 हजार भारतीयांकडेच बंदूक होती.
अमेरिकेच्या नॅशनल फायर आर्म्स सर्व्हेच्या अहवालानुसरा आता गन लायसन्स असणाऱ्या भारतीयांची संख्या वाढून 1 लाख 20 हजार झाली आहे. सर्व्हेनुसार 80 हजार भारतीयांनी गन लायसन्ससाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत भारतीय समुदायाला सर्वात शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते. येथे दर 100 नागरिकांमागे 120 बंदुका आहेत.
अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयनुसार अमेरिकेत 2020 मध्ये भारतीय वंशाच्या लोकांवरील हल्ले 500 टक्क्यांनी वाढले. यातील बहुतांश पीडित हे हिंदूधर्मीय होते. मागील 5 वर्षांदरम्यान हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटना वाढल्य आहेत. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या मोठ्या देशांमध्ये हिंदूंवरील हिंसा वाढली आहे. हिंदूफोबियाला एका कटाअंतर्गत बळ पुरविले जात असल्याचा आरोप अमेरिकेतील हिंदूंची संघटना सीओएचएनएचे निपुंज त्रिवेदी यांनी केला आहे.
भारतीय स्टोअर्सची लूट
मागील दोन वर्षांमध्ये भारतीयांवरील वंशद्वेषी हल्ल्यांच्या घटना 470 पर्यंत वाढल्या आहेत. अमेरिकेत स्टोअर चालविणाऱ्या भारतीयांना सोपी शिकार मानून गुन्हेगारांकडून लूट केली जात असल्याची माहिती एशियन अमेरिकन स्टोअर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विपुल पटेल यांनी दिली आहे. 6 महिन्यांमध्ये भारतीय वंशाच्या 12 जणांवर हल्ले झाले आहेत. कॅलिफोर्निया आणि जॉर्जियामध्ये स्टोअरमध्ये पार्टटाइम जॉब करणाऱ्या दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ओहायोत मागील महिन्यात भारतीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. या घटनांमुळे भारतीयांमधील दहशत वाढली आहे.