जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची ग्वाही, ‘जीवनदायी’तील हॉस्पिटल प्रतिनिधींची बैठक
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनावरील उपचारासाठी शासनाने दिलेले आदेश धुडकावून काही खासगी दवाखान्यांनी संधीचा गैरफायदा घेतला, त्यामुळे मार्चपासून जादा बिले घेणाऱयांची चौकशी करा, त्यांच्यावर तातडेने कारवाई करा, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. बैठकीत पदाधिकाऱयांनी ‘जीवनदायी’तील हॉस्पिटलच्या प्रतिनिधींना धारेवर धरले. यावर बिल तपासणीनंतरच रूग्णाला डिस्चार्ज दिला जाईल, याची अंमलबजावणी तातडेने केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जीवनदायी योजनेतील प्रतिनिधी आणि शिवसेना पदाधिकाऱयांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शिवाजीराव जाधव, दत्ताजी टिपुगडे, मंजित मोरे, डॉ. नांगरे, डॉ. राजश्री आदी उपस्थित होते.
शिवसेनेने निवेदनात शासन आदेश डावलून खासगी हॉस्पिटलनी संधीचा गैरफायदा घेतला आहे. काही हॉस्पिटल्स ‘जीवनदायी’चा लाभ रूग्णांना देत नसतील तर अशांची जबाबदार अधिकाऱयांमार्फत चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, शासननियुक्त लेखापरीक्षकाचा सही, शिक्का प्रत्येक बिलावर सक्तीचा करावा, रूग्णांवर दवाखान्यातील औषधांची सक्ती करू नये, शासकीय दरपत्रक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लावावे, जादा बिले आकारली असल्यास रूग्णांचे पैसे परत करावेंत, अशी मागणी केली आहे.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘जीवनदायी’तील हॉस्पिटल्सनी योग्य बिल आकारावे. पॅकेज असताना सुविधा द्याव्यात, योजनेत नसलेल्या हॉस्पिटल्सनी शासकीय दराने बिल आकारावे, अशी मागणी केली. ग्रामीण भागातील खासगी हॉस्पिटलनी योजनेतील दरपत्रक लावावे, अशी मागणी विजय देवणे यांनी केली. यावेळी उजळाईवाडी येथील एका हॉस्पिटलच्या बिलावरून प्रतिनिधींना धारेवर धरले.
हॉस्पिटल्स प्रतिनिधींनी उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजनेटेड बेड, व्हेंटिलेटर, फिजिशियनची कमी संख्या, रूग्णांना देण्यात येणाऱया सुविधा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या तक्रारी अन् व्यवस्थापनाची होणारी कोंडी मांडली. तसेच आवश्यक त्या सुचना स्वीकारल्या जातील, त्रुटी दूर केल्या जातील, अशी ग्वाही दिली.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, अव्वाच्या सव्वा बिले घेणाऱया हॉस्पिटलवर निश्चितच कारवाई होईल. पण आता कोणत्याही हॉस्पिटलमधील कोरोना, नॉन कोरोना रूग्णांना त्यांचे बिल लेखापरीक्षकांनी तपासल्यानंतरच डिसचार्ज दिला जाईल, त्याची कारवाई तातडीने केली जाईल, अशी ग्वाही दिली. महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये दरपत्रक लावले जाईल, असे स्पष्ट केले.