सोन्याच्या खाणीतील कामगार हल्ल्यात लक्ष्य
वृत्तसंस्था/ बीजिंग
मध्य आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत काम करणाऱया चिनी कामगारांना एका हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात 9 चिनी कामगारांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला स्थानिक बंडखोरांनी केला असल्याचे मानले जात आहे. परंतु स्थानिक बंडखोर गटांनी हा आरोप फेटाळून लावत रशियाच्या वॅगनर ग्रूपला या हल्ल्यासाठी जबाबदार ठरविले आहे.
सोन्याच्या खाणीत 9 मृतदेह सापडले आहेत. तर हल्ल्यात 2 जण जखमी झाले आहेत. गोल्ड कोस्ट ग्रूपकडून संचालित खाणीत हे चिनी कामगार काम करत होते अशी माहिती बांबरी, हाबिल मॅचीपतच्या महापौरांकडून देण्यात आली. तर हल्ल्यानंतर येथील चिनी दूतावासाकडून चिनी नागरिकांना राजधानी बंगुई बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चिम्बोलो येथील सोन्याच्या खाणीवर रविवारी हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी खाणीवर कब्जा करत गोळीबार सुरू केला होता. काही दिवसांपूर्वीच मध्य आफ्रिकेत तीन चिनी नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेनंतर अध्यक्ष फस्टिन आर्चंगई टुआदर यांनी चिनी गुंतवणुकदारांसोबत मिळून संबंधित भागाचा दौरा केला होता. तर रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याच संघटनेने स्वीकारलेली नाही. परंतु यामागे कोऑलिएशन ऑफ पॅट्रीयॉट्स फॉर चेंज या संघटनेचा हात असावा असे मानले जात आहे.
ही संघटना या क्षेत्रात अत्यंत सक्रीय असून देशाच्या सैन्यावर हल्ले करत असते. अनेक बंडखोर गटांची ही आघाडी माजी अध्यक्ष प्रेंकोइस बोजीजके यांच्यासोबत आहे. बोजीजके यांना 2013 साली मुस्लिमांचा प्रभाव असलेल्या संघटनांकडून पदावरून हटविण्यात आले होते.