अग्निशमन दलाने 70 जणांना वाचविले : आग लागण्याचे कारण अस्पष्ट
वृत्तसंस्था/ हनोई
व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये एका 9 मजली इमारतीला आग लागली आहे. या दुर्घटनेत 50 जणांचा मृत्यू झाला असून 54 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. अग्निशमन दलाने सुमारे 70 जणांना या दुर्घटनेतून वाचविले आहे. या इमारतीत सुमारे 150 जणांचे वास्तव्य होते. इमारतीला आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
इमारतीला सोमवारी रात्री सुमारे 11.30 वाजता आग लागली आहे. यानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.
रात्री लागलेल्या आगीनंतर बुधवारी देखील इमारतीतून धूराचे लोट बाहेर पडताना दिसून आले. इमारतीच्या छोट्या बाल्कनींना लोखंडी ग्रिल लावण्यात आले होते, तसेच अपार्टमेंट ब्लॉकमध्ये बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग होते आणि याव्यतिरिक्त अन्य आपत्कालीन दरवाजा नव्हता असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
व्हिएतनाममध्ये मागील वर्षी हो ची मिन्ह शहरात तीन मजली कराओके बारमध्ये आग लागल्याने 32 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेत 17 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर बार मालकाला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर 2018 मध्ये हो ची मिन्ह शहरातील एका अपार्टमेंटला आग लागल्याने 13 जणांना जीव गमवावा लागला होता.