प्रतिनिधी/ बेळगाव
शहराच्या विकासाच्या नांवाखाली शहरातील चांगली झाडे तोडण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र जीर्ण झालेली झाडे हटविण्याकडे वनखाते आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गोवावेस परिसरात जीर्ण नारळाचे झाड कोसळल्याने एक वृद्ध जखमी झाल्याची घटना घडली.
स्मार्टसिटीचे काम करण्यासाठी चिदंबरनगर परिसरात चांगली झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच विकासाच्या नांवाखाली शहर व उपनगरांमधील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पण नागरिकांना धोकादायक बनलेली झाडे हटविण्याकडे वन खाते आणि महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे खानापूर रोडवर गोवावेस येथील महावीर भवनजवळ कोसळलेल्या झाडामुळे वृद्ध जखमी झाला आहे. येथील नारळाच्या झाडाच्या मुळावरील माती वाहून गेली होती. तसेच मुळे खराब झाल्याने झाड धोकादायक बनले होते. रविवारी दुपारी सदर झाड कोसळले. यावेळी येथून जाणारे हिंदवाडी, वड्डर गल्ली येथील वृद्ध कृष्णा हणमंत शिवराय यांच्यावर अंगावर झाडाच्या फांद्या कोसळल्याने ते जखमी झाले आहेत.
शहर व उपनगरांमध्ये अशा प्रकारची असंख्य धोकादायक झाडे आहेत. याबाबत महापालिका आणि वन खात्याकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. गोवावेस येथील जलतरण तलावाच्या प्रवेशद्वारावरील झाडाच्या फांद्या विद्युत वाहिन्यांना लागत आहेत. तसेच वाऱयामुळे झाड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे सदर फांद्या हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. पण याबाबत अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. वनखात्याने धोकादायक झाडे हटविण्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.