वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार राज्याच्या सुपौल जिल्हय़ातील लालमोहन पासवान नामक 91 वर्षांच्या वृद्धाने सात दिवसात 450 राष्ट्रध्वज शिवून तयार करण्याचा विक्रम केला आहे. प्रतिदिन 12 तास काम करून त्याने हे लक्ष्य साध्य केले. लालमोहन पासवान स्वतःला गांधीवादी म्हणवून घेतात. महात्मा गांधीजींचा अहिंसेचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी आपण एवढय़ा वृद्ध वयातही ध्वज तयार करण्याचे काम हाती घेतले, असे त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
एका आठवडय़ात 450 ध्वज तयार करून देण्याचे कंत्राट त्यांना दोन आठवडय़ांपूर्वी मिळाले होते. ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत हे कंत्राट देण्यात आले होते. अवघ्या साडेसहा दिवसात अथक परिश्रम करून त्यांनी ते पूर्ण केले. ध्वजसंहितेतील नियमांचे काटेकोर पालन करून त्यांनी ध्वज इतक्मया कमी वेळात तयार केल्याने त्यांचे कौतुक होत असून सरकारनेही त्यांची पाठ थोपटली आहे.