झेक प्रजासत्ताकविरुद्ध 2-1 फरकाने विजय, थॉमस, कॅस्परचे निर्णायक गोल
बाकू / वृत्तसंस्था
थॉमस डेलॅनी व कॅस्पर डोल्बर्ग यांनी पहिल्या सत्रात केलेल्या प्रत्येकी एका गोलाच्या बळावर डेन्मार्कने झेक प्रजासत्ताकचा 2-1 अशा फरकाने पराभव करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. डेन्मार्कचा संघ या स्पर्धेत 1992 नंतर प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. झेकतर्फे पॅट्रिक स्किकने एकमेव गोल केला. त्याचा हा या हंगामातील एकूण पाचवा गोल ठरला. मात्र, संघाला या लढतीत विजय मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत.
बॉल पझेशनच्या आघाडीवर झेकने डेन्मार्कविरुद्ध किंचीत सरस वर्चस्व गाजवले. त्यांनी 53 टक्के बॉल पझेशन राखले. मात्र, गोलच्या निकषावर झेकचा संघ पिछाडीवर राहिला. डेन्मार्कतर्फे थॉमस डेलॅनीने पहिल्या सत्रात अवघ्या पाचव्या मिनिटालाच गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत जोरदार आघाडी मिळवून दिली. नंतर डोल्बर्गने 42 व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल नोंदवला. पहिल्या सत्रात केलेले हे दोन गोल डेन्मार्कला विजय मिळवून देण्यात निर्णायक ठरले.