प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यात विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल मोबाईल चोरट्यास शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचे 50 मोबाईल हस्तगत केले आहेत. या मोबाईल्सची किंमत 5 लाख 700 रुपये आहे.
विकास अशोक खंडागळे (वय 29 रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे अटक केलेल्या चोरट्याने नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर व परिसरात दुचाकी चोऱ्यांसह मोबाईल चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. मोबाईल चोरीच्या वाढत्या प्रकारामुळे वरिष्ठांनी हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपास करण्यास सांगितले. या अनुषंगाने तपास सुरु असताना दि. 9 जानेवारी रोजी साताऱयातील संभाजीनगरात सुरु असलेल्या बांधकाम साईटच्या पत्र्याच्या शेडमधून प्रतापसिंहनगरातील एकाने मोबाईल चोरल्याची माहिती मिळाली.
डीबीच्या तपास पथकाने यातील संशयित विकास खंडागळे याला 1 जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संभाजीनगरात केलेल्या चोरीची कबुली दिल्यावर 5 हजार रुपयांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर केलेल्या चौकशीत मात्र त्याने अनेक ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने तब्बल 50 मोबाईल चोरल्याचे सांगितल्याने पोलीस देखील चक्रावून गेले होते. पोलिसांनी त्याने चोरलेले 5 लाख 700 रुपये किंमतीचे तब्बल 50 मोबाईल हस्तगत करत अनेकविध मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.