राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती : 14 रोजी पुन्हा सुनावणी
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्य राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या वादग्रस्त सीडी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून अंतिम अहवाल तयार आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. राज्य सरकारच्यावतीने ऍडव्होकेट जनरल प्रभूलिंग नावदगी यांनी न्यायालयाला ही माहिती दिली आहे. दरम्यान, न्यायालयाने 14 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिली. सीडी प्रकरणातील ‘त्या’ युवतीने सादर केलेल्या कागदपत्रांचे इंग्रजीतील अनुवाद सादर न केल्याने न्यायालयाने युवतीच्या वकिलांना इंग्रजी अनुवादाच्या प्रती सादर करण्याची सूचना दिली. याचिकाकर्त्यांचे वकील जी. आर. मोहन यांनी युक्तीवाद करताना एका माजी मंत्र्यांच्या वादग्रस्त सीडी प्रकरणी मंत्री डॉ. के. सुधाकर आणि जे. सी. माधुस्वामी यांनी आक्षेपार्ह विधान करून तपास प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे, असा आरोप केला. दरम्यान दोन्ही पक्षांचे वाद-प्रतिवाद ऐकून न्यायालयाने सुनावणी 14 जुलैपर्यंत लांबणीवर टाकली.