प्रतिनिधी / वाकरे
कोल्हापूर -गगनबावडा राज्यरस्त्यावर दोनवडे येथील पुराचे पाणी कमी झाल्यामुळे मंगळवारी सकाळपासून या मार्गावरून वाहतूक पूर्ववत सुरू झाली.त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर. गेल्या गुरुवारी रात्री अकरा वाजता कोल्हापुर -गगनबावडा राज्य रस्त्यावर दोनवडे नजिक रस्त्यावर महापुराचे पाणी आल्याने या मार्गावरील गगनबावडा, कोकणात जाणारी वाहतूक रात्री बंद झाली होती. शुक्रवारी या मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येऊन वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती.
फक्त अत्यावश्यक सेवेसाठी आपत्कालीन योजनेची बोट कार्यरत होती. या बोटीत अत्यावश्यक सेवेसाठी आणि रूग्णांसाठी सोय करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी सात वाजता या मार्गावर एक फूट पाणी असल्याने केवळ पायी जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र वाहनांची वाहतूक बंद होती.
मंगळवारी सकाळी या रस्त्यावरील महापुराचे पाणी ओसरून रस्ता रिकामा झाल्याने वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यात आली. वाहतूक सुरू झाल्याने या परिसरातील जनजीवन सुरळीत सुरू झाले. तसेच सोमवारी रात्री गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या वाहनांनी गोकुळकडे दूध पुरवठा केला. सध्या दोनवडे येथे रस्त्याखाली सुमारे फूटभर पाण्याची पातळी गेली असून परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.