नवी दिल्ली ः
देशामध्ये कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेतही इन्फ्रा आणि रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी समाधानकारक कामगिरी केली असल्याचे पहावयास मिळाले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मधील जून तिमाहीत डीएलएफचे सेल्स बुकिंग जवळपास 7 पटीने वाढल्याची नोंद केली आहे. यासोबतच लार्सन ऍण्ड टुब्रोच्या बुकिंग ऑर्डरमध्येही 13 टक्क्यांची वाढ राहिली आहे.
सेल्स बुकिंग
देशातील सर्वात मोठी रियल इस्टेट कंपनी डीएलएफचे सेल्स बुकिंग 1014 कोटी रुपयांवर राहिले, जे वर्षभराअगोदर 152 कोटी रुपयांवर राहिले होते. या दरम्यान एकत्रित नफा 337 कोटींवर राहिला. जो वर्षभर अगोदर 71.52 कोटी रुपयांनी तोटय़ात होता. यासह उत्पन्नात दुप्पटीने वाढ होऊन ते 1,242.27 कोटी रुपयांवर राहिले आहे.
लार्सन ऍण्ड टुब्रोला ऑर्डर
वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत लार्सन ऍण्ड टुब्रोच्या बुकिंग ऑर्डरमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजे कंपनीला एप्रिल ते जून दरम्यान 26,557 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये 9,045 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर प्राप्त झाली आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जून तिमाहीत 1174 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो मागील वर्षातील समान कालावधीत 303 कोटी रुपये होता.