मागील 5 वर्षातील प्रत्येक ट्रेनिंग सेशनमध्ये, प्रत्येक कंडिशनिंग रुटिनमध्ये ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू ऍरियर्न टिटमस हिच्यासमोर एकच लक्ष्य होते, ते म्हणजे कॅटी लेडेकीला नमवण्याचे. 24 वर्षीय अमेरिकन चॅम्पियन कॅटी व ऑस्ट्रेलियन चॅलेंजर 20 वर्षीय टिटमस आमनेसामने भिडले, त्यावेळी टिटमसने आपली 5 वर्षांची साधना पणाला लावली व कॅटीला हरवण्याचे स्वप्नही प्रत्यक्षात साकारले!
अमेरिकन चॅम्पियन कॅटी लेडेकी हे जागतिक जलतरणातील अढळस्थान. तिचा आदर्श समोर ठेवतच अनेक जलतरणपटू घडले, घडताहेत. अर्थात, प्रतिस्पर्धी हा प्रतिस्पर्धी असतो. 20 वर्षीय ऑस्ट्रेलियन जलतरणपटू टिटमस हिने एकच लक्ष्य समोर ठेवले आणि त्या दृष्टीने तयारी केली. अमेरिकन कॅटी लेडेकी ही इतिहासातील सर्वात यशस्वी जलतरणपटू असून रिओ ऑलिम्पिकमध्ये 2 वर्ल्ड रेकॉर्डसह तिने 4 सुवर्णपदके जिंकली.
टिटमस व लेडेकी यांच्यात 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बरीच चुरस रंगली होती आणि यंदाही या उभयतात ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठावर जोरदार जुगलबंदी रंगणार, हे निश्चित होते. 400 मीटर्स फ्री स्टाईलमध्ये या दोघी आमनेसामने भिडल्या. कॅनेडियन मॅकन्तोश प्रारंभी जरुर आघाडीवर होती. मात्र, तिसऱया व चौथ्या लाईनमधील टिटमस व लेडेकी यांच्यात आणखी कोणा प्रतिस्पर्धीची तसदी घेण्याची गरज वाटत नव्हती. कारण, पहिल्या क्रमांकासाठी आपल्या दोघातच खरी चुरस असेल, याची त्या दोघींनाही पूर्ण कल्पना होती.
75 मीटर्स मार्कच्या आसपास लेडेकीने थोडीफार आघाडी घेतली होती. 100 मीटर्सचे अंतर पार होता होता, तिने 0.07 सेकंद कमी वेळ घेतला होता. मात्र, उर्वरित टप्प्यात अचानक टिटमसने जोर लावला आणि सुवर्ण जिंकत 5 वर्षांची आपली प्रतीक्षा फळेल, याची काटेकोर काळजी घेतली. ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. टिटमसने 1 मिनिट 53.50 सेकंद वेळेचा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित करत अव्वलस्थान संपादन केले. हाँगकाँगची सिओभन बर्नाडेट हॉघे 1 मिनिट 53.92 सेकंद वेळेसह रौप्यपदकाची तर कॅनडाची पेनी ओलेक्सियाक 1 मिनिट 54.70 सेकंद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. कॅटीला मात्र (1ः55.21 से.) येथे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.