ओनलाईन/टीम
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये, संपूर्ण देश उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असताना, संघाच्या पराभवानंतर हरिद्वारमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. भारतीय संघाचा प्रभाव झाल्याने रोशनबादमध्ये हरिद्वारच्या वंदना कटारियाच्या घराबाहेर काही लोकांनी फटाके फोडले. तसेच वंदनाच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. खूप दलित खेळाडू असल्यामुळेच संघ हरला असेही त्यांनी म्हटल्याचे वंदनाच्या कुटुंबाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, उपांत्य फेरीत महिला संघाचा पराभव जरी झाला असला तरी संपूर्ण भारत देश त्यांच्या आतापर्यंत खेळाचं कौतुक करत आहे. या सर्वादरम्यान, भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबाने केलेले आरोप गंभीर असल्याचे बोलले जात आहे. वंदनाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की काही तरुणांनी त्यांच्या घराबाहेर फटाके फोडले. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या व्यक्तीवर वंदनाच्या कुटुंबीयांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला नाही तर आम्ही आत्महत्या करु असे कुटुंबियांनी म्हटले आहे.